वाहतूककोंडीच्या जागतिक क्रमवारीने पुण्याची नाचक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:44 IST2025-01-18T09:44:08+5:302025-01-18T09:44:22+5:30
भाजपची सत्ताच जबाबदार असल्याची आप पक्षाची टीका

वाहतूककोंडीच्या जागतिक क्रमवारीने पुण्याची नाचक्की
पुणे : टोमटोम या संस्थेने वाहतूककोंडीच्या संदर्भात जगभरातील ५०० शहरांची पाहणी करून त्यात पुणे शहराला चौथा क्रमांक दिला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत मागील काही वर्षे सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाचीच ही कर्तबगारी असल्याची टीका करून आम आदमी पार्टीच्या (आप) पुणे शाखेने त्याविरोधात शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. पुण्याची नाचक्की करून मिळेल, अशा घोषणा देत त्यांनी यांचे संयोजक भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारीच असल्याचा आरोप केला.
आंदोलनात आपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या पुणे दौऱ्यात काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वाहतूककोंडीबाबत व्यक्त केलेल्या जाहीर नाराजीचाही उल्लेख केला. त्याचबरोबर थेट राष्ट्रपतींनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल भाजपच्या जबाबदार सत्ताधिकाऱ्यांनी घेतली नाही, त्यामुळेच आधीच सातवा असलेला क्रमांक आता चौथा झाला असेही आंदोलन पाहण्यासाठी जमलेल्या पुणेकरांना सांगितले. साखर संकुल चौकात सकाळी ११ वाजता झालेल्या या आंदोलनात सुबह शाम सभी रस्ते जाम ही जाम अशाही घोषणा दिल्या. महापालिका, राज्यात व दिल्लीतही गेली काही वर्षे भाजपची सत्ता आहे, मात्र त्यांनी पुणे शहरासाठी मोठमोठ्या घोषणा करण्याव्यतिरिक्त काहीही केले नाही, अशी टीका यावेळी करण्यात आली.
पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा समावेश केला. त्यासाठी काही कोटी रुपयांचा खर्च झाला. फक्त अत्याधुनिक सिग्नल्ससाठीच काही कोटी रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पुणे आहे तिथेच राहिले असे नाही तर आहे त्यापेक्षाही खाली गेले. पुणेकरांनी भाजपला सगळी राजकीय सत्ता दिली, ते मात्र भ्रष्टाचार व बेजबाबदार कारभार याशिवाय दुसरे काहीच द्यायला तयार नाहीत.
सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, शंकर थोरात, सुरेखा भोसले, अक्षय शिंदे, प्रशांत कांबळे, मिलिंद ओव्हाळ, सुभाष कारंडे, शेखर ढगे, कुमार घोंगडे, संजय कटारनवरे, सैद अली, संतोष काळे, सुनील सौदी, फबीयन सॅमसन, अभिजित मोरे, अमित म्हस्के, विकास चव्हाण, शिवाजी डोलारे, कविता गायकवाड व पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.