'पुण्याचं तापमान ४५ डिग्रीपर्यंत जाणार', या मेसेज मागचं सत्य काय? हवामान विभागानं दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:25 IST2025-04-29T17:23:59+5:302025-04-29T17:25:10+5:30
शास्त्रीयदृष्ट्या एक महिना अगोदर असं कोणतंही तापमान सांगणं अशक्य असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे

'पुण्याचं तापमान ४५ डिग्रीपर्यंत जाणार', या मेसेज मागचं सत्य काय? हवामान विभागानं दिलं स्पष्टीकरण
पुणे : येत्या काही दिवसांत तापमान ४५ ते ५५ अंश सेल्सियस दरम्यान वाढण्याची शक्यता आहे आणि क्यूम्यलस ढगांच्या उपस्थितीमुळे अनेक भागांमध्ये घुसमटणारे वातावरण निर्माण होईल. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत कोणताही व्यक्ती घराबाहेर (उघड्यावर) जाणार नाही. कारण हवामान खात्याने सूचित केले आहे की तापमान ४५ अंश सेल्सियस ते ५५ अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. असा मेसेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्याबाबत आता हवामान विभागाचे एस. डी. सानप यांनी खुलासा केला आहे. आमच्याकडून अशी कोणतीही माहिती दिली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सानप म्हणाले, सोशल मीडियावर काही मेसेज पसरले आहेत. त्यामध्ये सांगितलं जातंय की 29 मे ते 2 जून पर्यंत तापमान हे 45 डिग्रीपर्यंत जाईल. शास्त्रीयदृष्ट्या एक महिना अगोदर असं कोणतंही तापमान सांगणं अशक्य आहे. आमच्याकडून अशी कोणतीही माहिती दिली गेलेली नाहीये. पुण्याचा सध्याचे तापमान हे 38 डिग्री पासून 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे. परवा दिवशी लोहगावचं तापमान हे 42.6 डिग्री सेल्सिअस पर्यंत दाखवल गेल होत. त्या दिवशीच महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान लोहगावचं होतं. इतके दिवस विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान होतं. परंतु काही दिवसांमध्ये तिथे ढगाळ वातावरण झालं. विजेच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यामुळे तिथल तापमान हे कमी झाल. पुण्यामध्ये देखील अशी स्थिती काही दिवसांमध्ये होऊ शकते. पुण्यातले तापमान देखील एक ते दोन डिग्री सेल्सिअसने कमी होऊ शकतं असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान चाळीशी पार
राज्यात मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सियसने घट झाली. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा तसेच सोलापूरसह विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा उतरला आहे. मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. राज्यात पुण्यातील लोहगाव येथे ४२.८ अंश सेल्सियस नोंदविले गेले. पुढील दोन दिवसांत परभणी व हिंगोलीमधील तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.