Pune ZP Election Result 2026: ‘गड आला पण सिंह गेला’ मतदारांची खंत; अजितदादांच्या निधनानंतर बारामतीकरांचा ‘राष्ट्रवादी’ला काैल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 09:43 IST2026-02-10T09:43:15+5:302026-02-10T09:43:45+5:30
Pune ZP Election Result 2026 अजित पवार यांच्याशिवाय आणि त्यांचा कोणताही सहभाग नसलेली, कोणताही प्रचार नसलेली, मतदारांशी त्यांचा थेट संवाद नसलेली बारामतीच्या इतिहासातील ही पहिलीच निवडणुक होती

Pune ZP Election Result 2026: ‘गड आला पण सिंह गेला’ मतदारांची खंत; अजितदादांच्या निधनानंतर बारामतीकरांचा ‘राष्ट्रवादी’ला काैल
बारामती: विमान अपघातात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली ‘एक`झीट‘ च्या धक्क्याने बारामतीकर आजही सावरलेले नाहीत. याच वातावरणात जिल्हा परीषद, पंचायत समितीची निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र,बारामतीच्या जनतेने आपल्या नेत्याने दिलेल्याच उमेदवारांनाच भरभरुन मतदान केले. सोमवारी(दि ९) जाहिर झालेल्या निकालानंतर ‘गड आला पण सिंह गेला’अशी खंत बारामतीकरांनी व्यक्त केली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २४ जानेवारी रोजी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. कन्हेरीची प्रचारसभा त्यांची बारामतीची शेवटची सभा ठरली. २८ जानेवारी रोजी याच निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला निघाले होते. मात्र,तत्पुर्वीच विमान दुर्घटना घडुन त्यांनी अकाली ‘एक`झीट’ घेतली. त्यामुळे हि निवडणुक बारामतीकरांसाठी भावनिक होती.
बारामती तालुक्यातील ६ गट आणि १२ गणांमध्ये ही निवडणुक पार पडली. महायुतीतच राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये प्रमुख लढत झाली. मात्र, सर्वांनीच,सर्व पक्षांनी कोणतीही प्रचारसभा, रॅली शक्तीप्रदर्शन न करण्याची नैतिकता पाळत दुर्घटनेबाबतचा शोक व्यक्त केला. अजित पवार यांच्याशिवाय आणि त्यांचा कोणताही सहभाग नसलेली, कोणताही प्रचार नसलेली, मतदारांशी त्यांचा थेट संवाद नसलेली बारामतीच्या इतिहासातील ही पहिलीच निवडणुक होती. सर्वच पक्षांनी घरोघरी जात प्रचार करण्यावर भर दिला. यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी, निवडणुकीचा उत्साह दिसून आलेला नव्हता. या जाहीर झालेल्या निकालात अजित पवार यांनीच दिलेल्या उमेदवारांना विजयी करीत आपल्या नेत्याचा मान उंचावला. ६ जिल्हा परीषद गटाज सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार उच्चांकी मताने निवडणुन आले.या ६ जागांवर भाजपचा सुफडासाफ झाला.तर पंचायत समितीच्या १० जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला.तर अजित पवार यांनी सुपा गण आणि शिर्सुफळ गणातील दोन जागांवर उमेदवार न देता भाजपसाठी या जागा सोडल्या होत्या. केवळ या दोन जागांवर भाजपचे उमेदवार निवडुन आले आहेत.
महायुतीतील प्रमुख घटक पक्ष भाजप आणि शिंदेसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात थेट उमेदवार उभे केल्याने नगरपरिषदेपाठोपाठ या निवडणुकीतही महायुतीत अंतर्गत निवडणुक पार पडली. भाजप केवळ सुपे, पणदरे, वडगांव निंबाळकर, निंबुत या चार गटांमध्ये तर अजित पवार यांनी सोडलेल्या दोन जागांसह कार्हाटी, पणदरे, गुणवडी, मुढाळे, मोरगांव, वडगांव निंबाळकर, निंबुत, कांबळेश्वर या १० जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रींगणात उतरविले होते. मात्र, बारामतीकरांनी राष्ट्रवादीने सोडलेल्या शिर्सुफळ आणि सुपा जागा सोडल्यास अन्य ठीकाणी भाजप उमेदवारांना नाकारले.मोठ्या मताधिक्याने भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे.
या निवडणुकीत अजित पवार यांनी राष्ट्रवादी च्या माध्यमातून ने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देत निवडणुकीत उतरविले.अजित पवार यांनी भाजप माजी पदाधिकारी व जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अभिजीत देवकाते पाटील यांच्या पत्नी शिवानी अभिजीत देवकाते पाटील यांना निरावागज जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी (अजित पवार ) ची उमेदवारी दिली होती.