Pune ZP Election Result 2026: राज्यात पुण्यातील मोनिका हरगुडे यांना लक्षवेधी मते; तब्बल २४,११५ विक्रमी मतांनी दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:18 IST2026-02-12T11:16:21+5:302026-02-12T11:18:39+5:30
Pune ZP Election Result 2026 शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या मोनिका हरगुडे व अपक्ष सीमा कळमकर यांच्यात थेट लढत झाली

Pune ZP Election Result 2026: राज्यात पुण्यातील मोनिका हरगुडे यांना लक्षवेधी मते; तब्बल २४,११५ विक्रमी मतांनी दणदणीत विजय
कोरेगाव भीमा : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादीच्या मोनिका हरगुडे यांनी तब्बल २४,११५ मतांची विक्रमी आघाडी घेत राज्यात लक्षवेधी विजय मिळवला. तर, सणसवाडी-कोरेगाव भीमा पंचायत समिती गणातून अपक्ष कोमल ढेरंगे आणि शिक्रापूर-कासारी गणातून राष्ट्रवादीचे रामराव सासवडे यांनी विजय संपादन केला.
शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीच्या मोनिका हरगुडे व अपक्ष सीमा कळमकर यांच्यात थेट लढत झाली. अपक्ष उमेदवार सीमा कळमकर यांना भाजपचा पाठिंबा असल्याने ही लढत अधिक चुरशीची ठरली. मात्र निकालात मोनिका हरगुडे यांना २६,३२६ तर, सीमा कळमकर यांना अवघी २,२११ मते मिळाली. त्यामुळे हरगुडे यांनी तब्बल २४,११५ मतांनी दणदणीत विजय नोंदवला.
दरम्यान, सणसवाडी-कोरेगाव भीमा पंचायत समिती गणात राष्ट्रवादीच्या मनीषा संपत गव्हाणे, अपक्ष कोमल सत्यनारायण ढेरंगे आणि मीना शिवाजी ढेरंगे या तीन महिला उमेदवारांमध्ये लढत झाली. अपक्ष कोमल ढेरंगे यांनी ७,४५३ मते मिळवत राष्ट्रवादीच्या मनीषा गव्हाणे (६,३००) यांचा १,१५३ मतांनी पराभव केला. या विजयामुळे कोरेगाव भीमाला पहिली महिला पंचायत समिती सदस्या मिळाल्याची नोंद झाली.
शिक्रापूर-कासारी पंचायत समिती गणात राष्ट्रवादीचे रामराव सासवडे व भाजपचे पंढरीनाथ गायकवाड यांच्यात लढत झाली. अनेक स्थानिक दिग्गजांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा असतानाही रामराव सासवडे यांनी ७,९२८ मते मिळवत गायकवाड (६,८३९) यांचा १,०८९ मतांनी पराभव केला.
हरगुडे यांना ‘तिसरी लॉटरी’
मोनिका हरगुडे या मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादीकडून पंचायत समितीवर निवडून येत प्रथम उपसभापती, त्यानंतर सभापती पदावर विराजमान झाल्या होत्या. आता जिल्हा परिषद निवडणुकीत विक्रमी विजय मिळवत त्यांनी जिल्हा परिषदेत प्रवेश केला असून, राजकीय कारकिर्दीतील ही त्यांची तिसरी लॉटरी मानली जात आहे.