Pune ZP Election 2026: बालेकिल्ला वाचवण्यासाठी घड्याळ एकत्र? राजकीय हालचालींना वेग, शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:07 IST2026-01-14T11:07:17+5:302026-01-14T11:07:42+5:30

Pune ZP Election 2026 पुण्यातील नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्वाधिक १६१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापाठाेपाठ भाजप ९९, शिंदेसेना ५१ जागा मिळाल्या आहेत

Pune ZP Election 2026 Clock together to save the fort? Political movements accelerate, Shinde Sena's slogan of self-reliance | Pune ZP Election 2026: बालेकिल्ला वाचवण्यासाठी घड्याळ एकत्र? राजकीय हालचालींना वेग, शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा

Pune ZP Election 2026: बालेकिल्ला वाचवण्यासाठी घड्याळ एकत्र? राजकीय हालचालींना वेग, शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा

पुणे: नगरपरिषद निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा बिगुल वाजला आहे. पक्षीय पातळीवर वाटाघाटीला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी पक्षप्रवेशांना जोर आला आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडत असलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे अपवाद वगळता सर्व ठिकाणी एकत्र आले असून त्याचा परिणामही सकारात्मक दिसत आहे. जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बालेकिल्ल्यात भगदाड पडू नये यासाठी दोन्ही गट एकत्र आलेला पॅटर्न जिल्ह्यातही राबविण्याचा तयारी दोन्ही गटातील नेत्यांकडून सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या १४ नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वाधिक १६१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापाठाेपाठ भाजप ९९, शिंदेसेना ५१ जागा मिळाल्या आहेत. स्थानिक पातळीवर या निवडणुका लढवल्या गेल्या असल्या तरी या नागरिकांच्या मनात कोणत्या पक्षाचे स्थान आहे हे या निकालावरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये एका नवा पॅटर्न उदयास आला आहे. अपवाद वगळता जागांची वाटाघाटी करत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे त्याचा परिणामत सकारात्मक असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही तो पॅटर्न राबविण्याची तयारी दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचही नस ही ग्रामीण भागात आहे. यामुळे जिल्हा परिषद असाे अथवा पंचायत समिती दोन्हीकडेही राष्ट्रवादीच्या घडळ्याचीच टिकटिक वाजवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जुन्नरमध्ये जुळवाजुळव, तर खेडमध्ये नाराजीचे वादळ

जुन्नर तालुक्यामध्ये पूर्वीपासून शिवसेनेचा प्रभाव अधिक आहे. इथल्या नगरपरिषदेवरही शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यामुळे या ठिकाणी शिंदेसेना एकत्र लढण्यास तयार होणार नाही हे नक्की. तर दुसरीकडे माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांना मानणारा वर्गही मोठा आहे. भाजपची पाळेमुळे तळागाळात रुजवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याने त्याही स्वबळालाच पसंती देतील अशी शक्यता नाकारता येत नाही. याउलट माजी आमदार अतुल बेनके यांनी अजित पवार गट आणि शरद पवार गटाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे खासदार अमोल कोल्हे आणि अतुल बेनके यांची मैत्री तर सर्वश्रुत आहे. राजकारणामध्ये कमी जास्त होत राहते, पण मैत्री ही कायम राहते. त्यामुळे तालुक्यामध्ये दोन्ही गटाला एकत्र आणण्यासाठी यशस्वी जुळवाजुळव अंतिम टप्प्यात आली असल्याचे समजते.

खेड तालुक्यात भाजप कमकुवत

खेडमध्ये मात्र, नाराजीचे वाद उठले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे-पाटील हे हातात घड्याळ बांधणार असल्यामुळे खेड तालुक्यात भाजप कमकुवत झाल्याचे चित्र आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील हे बुट्टे पाटील पक्ष प्रवेशामुळे नाराज असल्याचे दिसते. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमाेर नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान आहे.

सात तालुक्यांमध्ये कुठे चौरंगी तर कुठे बहुरंगी लढाई

आंबेगावचे माजी मंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, भोर-वेल्हा-मुळशी आमदार शंकर मांडेकर हे आपल्या मतदार संघामध्ये स्वबळावरच लढण्याला पसंती देणार असल्याचे समजते. शिवाय पुरंदरमधील शरद पवार गट हा भाजपचे माजी आमदार संजय जगताप यांना झुकते माप देण्याच्या तयारीत आहे. यामुळे या सात तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

काँग्रेसला शोधायला लागणार उमेदवार

जिल्ह्यामध्ये काँग्रेसची ताकद अत्यंत तोकडी होती. त्यातच माजी आमदार संजय जगताप, संग्राम थोपटे हे भाजपच्या गोटात दाखल झाल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नाहीशी झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये उमेदवार शोधण्याची काँग्रेसवर वेळ आली आहे.

दौंड, इंदापूरमध्येही एकत्रीकरणाचा पॅटर्न

माजी आमदार रमेश थोरात पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. शिवाय शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी असलेला संपर्क पाहता या ठिकाणीही सूत जुळण्याची चिन्हे आहेत. तर इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाचे नेते असले तरी नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय पॅनलमध्ये सहभागी झाले होते. वास्तविक ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात होती. मात्र, इतका सगळा विरोध असतानाही मंत्री भरणे यांनी नगरपरिषदेवर घड्याळाची सत्ता आणली होती. या तालुक्यातील राष्ट्रवादीची दौंड तालुक्यासारखीच परिस्थिती आहे. प्रत्येक नेत्याचा गट असून राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र असा गट आहे. तालुक्यातील शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून अजित पवार गटाला झुकते माप देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे इंदापूरमध्येही एकत्रीकरणाचा पॅटर्न पाहायला मिळेलच, पण राष्ट्रवादीविरोधात दोन्ही गट एकवटल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.

शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिंदेसेने स्वबळाचा नारा दिला आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये शिंदे गट हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यामुळे ग्रामीण पातळीवर पक्षाचा आत्मविश्वास वाढला गेला असून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला असून व्यूहरचना आखण्यास सुरुवात देखील केली आहे.

Web Title : पुणे ZP चुनाव 2026: क्या एनसीपी गुट गढ़ बचाने के लिए एकजुट होंगे?

Web Summary : पुणे ZP चुनावों में एनसीपी का दबदबा बनाए रखने के लिए संभावित एकता। गुट नगरपालिका चुनावों के बाद गठबंधन तलाश रहे हैं। शिंदे सेना अकेले चुनाव लड़ने पर जोर दे रही है। स्थानीय गतिशीलता रणनीतियों को प्रभावित करती है।

Web Title : Pune ZP Election 2026: NCP factions unite to retain stronghold?

Web Summary : Pune ZP elections see potential NCP unity to safeguard its dominance. Factions explore alliances post-municipal polls. Shinde Sena pushes for solo contest. Local dynamics vary across talukas influencing strategies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.