Zilla Parishad Election :गट, गणांसाठी अर्ज केवळ ऑफलाइनच, १३ तालुक्यांत सुविधा उपलब्ध, शुक्रवारपासून स्वीकृती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 20:49 IST2026-01-14T20:49:18+5:302026-01-14T20:49:37+5:30
जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या ठिकाणी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

Zilla Parishad Election :गट, गणांसाठी अर्ज केवळ ऑफलाइनच, १३ तालुक्यांत सुविधा उपलब्ध, शुक्रवारपासून स्वीकृती
पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज केवळ पारंपरिक पद्धतीने अर्थात ऑफलाइन म्हणजेच समक्ष भरले जाणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून (दि.१६) सुरू होत आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या ठिकाणी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. नगर परिषद निवडणुकीत दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत होते. मात्र, त्यात तांत्रिक अडचण आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ही सुधारणा केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली असून, अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया शुक्रवारपासून (दि. १६) सुरू होईल. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी असून, दुपारी ३:०० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. दरम्यान, १८ जानेवारी रोजी रविवार असल्याने त्या दिवशी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उमेदवारी अर्जाचा नमुना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज व शपथपत्रात संपूर्ण माहिती भरून तो संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावा. जिल्ह्यातील १३ तालुक्यांच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
उमेदवारी अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी करण्यात येणार असून, वैध ठरलेल्या अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. मात्र, दि. २५ व दि. २६ जानेवारी रोजी सार्वजनिक सुटी असल्याने त्या दिवशी अर्ज मागे घेता येणार नाहीत. दि. २७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीननंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचवेळी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. येत्या ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार असून, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपलब्ध ठिकाणे
जुन्नर - पंचायत समिती कार्यालय, जुन्नर
आंबेगाव - तहसील कार्यालय आंबेगाव
शिरुर - नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय शिरुर
खेड - उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजगुरूनगर
मावळ - तहसील कार्यालय, मावळ (वडगाव)
मुळशी - तहसील कार्यालय, मावळ (पौड)
हवेली - सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, आंबेगाव बुद्रुक.
दौंड - नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय
पुरंदर - नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय
वेल्हे - तहसील कार्यालय
भोर - तहसील कार्यालय
बारामती - तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत
इंदापूर- नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय