Pune Police: पुण्यात महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून ७ लाख उकळले; रील स्टार सोनाली हिंगेसहित २ पोलिसांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:00 IST2026-04-09T13:56:38+5:302026-04-09T14:00:24+5:30
पुण्यातील या प्राचार्य महिलेला तुमच्यावर 'पॉक्सो' अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल अशी भीती दाखवण्यात आली होती

Pune Police: पुण्यात महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून ७ लाख उकळले; रील स्टार सोनाली हिंगेसहित २ पोलिसांवर गुन्हा दाखल
पुणे : एका नामांकित संस्थेच्या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करून ७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सोनाली हिंगे या रील स्टार असल्याची मिळत आहे. विशेष म्हणजे ‘दामिनी पथका’शी संबंधित असलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव या प्रकरणात आल्याने प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ही मोठी कारवाई केली आहे. सोनाली हिंगे या पोलीस दामिनी मार्शल असून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून त्या प्रसिद्ध रील स्टार देखील आहेत. तसेच सुदाम तायडे यांची शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे नेमणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील या प्राचार्य महिलेला तुमच्यावर 'पॉक्सो' (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्हाला अटक केली जाईल, अशी भीती या पोलिसांनी दाखवली. तुमच्यावर कारवाई केली जाईल असे सांगत प्रकरण मिटवण्यासाठी 7 लाख रुपयांची मागणी केली. अटकेच्या आणि बदनामीच्या भीतीने प्राचार्या महिलेने ही रक्कम या पोलिसांना दिली. मात्र, हा सर्व प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
रील स्टार सोनाली हिंगेचा समावेश
या गंभीर प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली आणि सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून प्रसिद्ध असलेली महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिचा समावेश असल्याने चर्चांना उधाण आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे ही तक्रार प्राप्त होताच, त्यांनी या प्रकरणाबाबत तत्काळ चौकशीचे आदेश दिले. तसेच प्राथमिक चौकशीत पोलिसांचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी कडक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.