पुणे विभागात पुण्याचीच बाजी; जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल, नगरचा निकाल ८६.३४ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:25 IST2025-05-05T18:23:57+5:302025-05-05T18:25:48+5:30
राज्याच्या एकूण निकालाचा विभागनिहाय विचार करता पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे, गतवर्षी पुणे विभागाने तिसरे स्थान पटकावले होते

पुणे विभागात पुण्याचीच बाजी; जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल, नगरचा निकाल ८६.३४ टक्के
पुणे: बारावीच्या निकालात पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यानेच बाजी मारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हाेत आहे. पुणे विभागाचा एकत्रित निकाल ९१.३२ टक्के लागला असून, यात पुणे जिल्हा सर्वाधिक ९४.८७ टक्के, तर त्याखालाेखाल सोलापूर जिल्हा ८८.६२ टक्के आणि सर्वात कमी अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ८६.३४ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
पुणे विभागात एकूण २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. यापैकी २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. त्यातील २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. यंदाचा निकाल ९१.३२ टक्के लागला आहे. गतवर्षीही पुणे जिल्हा अव्वल स्थानी होता.
गतवर्षी पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यावरून विभागातील तिन्ही जिल्ह्यांच्या निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गैरमार्ग प्रकरणांची संख्या घटल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. गतवर्षी ९५ प्रकरणांची नोंद झाली हाेती, ती यंदा ६६ वर आली आहे.
राज्याच्या तुलनेत विभागाची घसरण
राज्याच्या एकूण निकालाचा विभागनिहाय विचार करता पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे. गतवर्षी पुणे विभागाने तिसरे स्थान पटकावले होते. दरवर्षीच्या निकालात कोकण विभाग प्रथम स्थानावर असतो. पुणे विभागात येणाऱ्या तिन्ही जिल्ह्याचा निकाल यंदा घटला आहे.
जिल्हानिहाय चित्र
१) पुणे : पुणे जिल्ह्यात यंदा बारावीसाठी १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. त्यातील १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे.
२) अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ६० हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यातील ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ८६.३४ इतकी आहे.
३) साेलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा बारावी परीक्षेसाठी एकूण ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हाेती. त्यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले हाेते. त्यातील ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची एकूण टक्केवारी ८८.३२ इतकी आहे.
मुला-मुलींचे प्रमाण काय?
- पुणे जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.७४ टक्के, तर मुलांचा निकाल ९३.१५ टक्के लागला.
- अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९२.५१ टक्के, तर मुलांचा निकाल ८१.४० टक्के लागला.
- सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.६२ टक्के, तर मुलांचा निकाल ८४.६४ टक्के लागला.
शाखानिहाय स्थिती
- विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.०१ टक्के
- वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३२ टक्के
- कला शाखेचा एकूण निकाल ७४.२४ टक्के
- व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ८४.१५ टक्के
- तंत्रविज्ञान शाखेचा निकाल ७२.०३ टक्के