- किरण शिंदेपुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या आणि सिगारेटचे पाकिटे सापडल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या गैरप्रकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, विद्यार्थी संघटनांनी या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थीनीने वारंवार तक्रारी करूनही महिला वसतिगृह अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर संबंधित विद्यार्थीनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरूंना पत्र लिहून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.
विशेष म्हणजे, वसतिगृहाच्या गेटवर बायोमेट्रिक यंत्रणा कार्यरत असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य आणि इतर नशेचे पदार्थ आत कसे आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी कुलगुरूंना लेखी पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून, लवकरच चौकशी समिती गठित केली जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.