SPPU Exam: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 10:24 IST2021-12-27T10:21:32+5:302021-12-27T10:24:13+5:30

परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाच्या चारही अधिष्ठातांची बैठक गेल्या आठवड्यात होणार होती. मात्र, विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही

pune university exams online or offline sppu omicron | SPPU Exam: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता?

SPPU Exam: पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता?

पुणे:पुणे विद्यापीठाशी (Savitribai Phule Pune University) संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांत सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. काही महिन्यांपासून राज्यातील कोरोनाविषयक परिस्थिती आटोक्यात आली होती. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून महाविद्यालयांसह सर्व काही खुले करण्यात आले. मात्र, महिन्याभरापासून राज्यात ओमायक्रॉनचा (omicron) शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात, याबाबत निर्णय घेतला गेला नाही. विद्यापीठाच्या चारही अधिष्ठातांची समिती स्थापन करून या समितीकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय सोपविण्यात आला आहे.

परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाच्या चारही अधिष्ठातांची बैठक गेल्या आठवड्यात होणार होती. मात्र, विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्याव्यात, याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही. विद्यापीठातर्फे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना एक महिना आधी परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन हे समजणे अपेक्षित आहे. मात्र, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्यानंतरच येत्या मंगळवारी किंवा बुधवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोरोनाविषयक परिस्थिती विचारात घेऊन ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यातच विविध विद्यार्थी संघटनांकडून ऑनलाईन परीक्षेची मागणी केली जात आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांचा ऑफलाईन परीक्षेसाठी आग्रह आहे.

Web Title: pune university exams online or offline sppu omicron