Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:12 IST2025-11-17T13:09:06+5:302025-11-17T13:12:06+5:30
Pune Train Accident News: पुण्यातील मांजरी रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडला. रेल्वे गाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Train Accident News: पुण्यातील मांजरी रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात घडला. पॅसेंजर रेल्वे गाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत्यू झालेले तीनही तरुण हडपसर भागातील राहत होते. पोलिसांनी त्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. प्रथमेश नितीन तिंडे (वय १८, काळेपडळ, हडपसर), तन्मय महेंद्र तुपे (वय १८, विशाल कॉलनी गोपाळपट्टी, हडपसर), तुषार शिंदे (वय १९, गोपाळपट्टी, हडपसर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
पुणे-दौंड पॅसेंजर रेल्वेने उडवले
पोलिसांनी सांगितले की, पुणे-दौंड पॅसेंजर रेल्वेच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. पुणे स्थानकावरून पॅसेंजर रेल्वे दौंडला निघाली होती. पाच मित्र रेल्वे रुळाजवळ उभे होते. त्याचवेळी रेल्वेने त्यांना धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे या अपघातातून बचावले. ते घटनास्थळावरून फरार झाले.
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळांचा पंचनामा केला आणि तिघांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.
अपघाताचा तपास सुरू
अपघाती मृत्यू झाल्याची नोंद हडपसर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे तरुण रेल्वे रुळाजवळ कशासाठी गेले होते. तिथे काय करत होते. अपघात कसा घडला, याबद्दलचा तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात घडला, तिथे आजूबाजूला कुठेही सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे तपासानंतरच संपूर्ण घटनाक्रम समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.