In Pune, a trailer blew up eight vehicles, killing two and seriously injuring three | पुण्यात ट्रेलरने ८ वाहनांना उडविले, दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर

पुण्यात ट्रेलरने ८ वाहनांना उडविले, दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर

ठळक मुद्देअपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावर सहा किलोमीटरपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी, २ दुचाकी व एक रिक्षा अशा ८ वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. आठ वाहनांना उडविल्यानंतर नवले पुलाच्याजवळ या ट्रेलरला आग लागली होती.

या अपघातात रिक्षाचालक राजेंद्र मुरलीधर गाडवे( वय ६५, रा. आंबेगाव खुर्द) व प्रशांत गोरे ( वय ३२, रा. उस्मानाबाद) या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी जखमी असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास २२ चाकी ट्रेलर सातारा बाजूकडून ४१ टन लोखंड घेऊन मुंबई बाजूकडे जात होता. भूमकर पुलाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने पुढे चाललेल्या ८ वाहनांना एका पाठोपाठ एक अशी जोरदार धडक दिली. तसेच त्यानंतर ट्रेलरची पुलावरील कठड्याला धडक बसल्याने ट्रेलर ने पेट घेतला.

याबाबतची माहिती मिळताच पीएमआरडी व पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रेलरने धडक दिल्याने रिक्षाचालक बाहेर पडले. तेव्हा बाजूने जाणाऱ्या वाहनांनी त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात कारमधील अनेक जण अडकून पडले होते. त्यांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर ट्रेलर चालक प्रेमराज बिष्णोई ( वय २५, रा. जोधपूर, राजस्थान) याला नागरिकांनी पकडून जोरदार मारहाण केली.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची खबर मिळताच घटनास्थळी सिंहगड रस्ता पोलीस व सिंहगड वाहतूक विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहचून मदत कार्य केले. अपघातामुळे वाहतूक कोंडी झाल्याने महामार्गावर सहा किलोमीटरपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात येत होती.

अपघातांची मालिका सुरूच; राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष
कात्रज नवीन महामार्गावरील या भागात नेहमी अपघात होत असतात. तरीही येथील तीव्र उतार कमी करण्याबाबत महामार्ग प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. मुळात या ठिकाणी महामार्ग बांधणीमध्येच दोष असल्याने सांगितले जाते. परंतु तरीही त्यात सुधारणा केली जात नाही. गेल्या बुधवारी पहाटे अशाच पद्धतीने याच ठिकाणी एका ट्रकने ८ वाहनांना धडक दिली होती. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. दुसर्या ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला क्रेन मागवून वाहने बाजूला करुन बाहेर काढावे लागले होते.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In Pune, a trailer blew up eight vehicles, killing two and seriously injuring three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.