पुणे :पुणे शहर पोलिस आयुक्तालयात लवकरच वाहतुकीच्या संदर्भात प्रशिक्षण देणारी, प्रत्यक्ष साधनसामग्रीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी वाहतूक प्रशिक्षण अकादमी (ट्रॅफिक ट्रेनिंग अकॅडमी) सुरू होणार आहे. पुण्यासह पिपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथे कार्यरत असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना येथून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्यक्ती, शालेय विद्यार्थी, स्कूल बसचालकांना देखील येथे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
शहरात वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. पुढील कालावधीत या समस्येवर उपाययोजना करून, शहरातील वाहतूक कशाप्रकारे सुरळीत करता येईल. याबाबत तत्काळ आणि कालांतराने कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याचा अभ्यास गेल्या काही दिवसांपासून वाहतूक विभागाकडून केला जातो आहे. त्यासाठी काही खासगी संस्थांची देखील मदत घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी आय.टी.एम.एस. (इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) हा उपक्रम शहरात सुरू केला आहे. त्या उपक्रमांतर्गत वाहतूक प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ही दुसरी वाहतूक प्रशिक्षण अकादमी असणार आहे.
शुक्रवारी (दि. ८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. यावेळी यशदा येथे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वाहतूकीच्या संदर्भात पुणे पोलिस करत असलेल्या कामांचे सादरीकरण केले. त्यामध्ये त्यांनी मुंबई येथील भायखळा येथे वाहतूक पोलिसांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेसारखीच एक प्रशिक्षण संस्था पुण्यात हवी, असे मत मांडले. त्याला तत्काळ मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत लवकरच ही प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहे. त्यासाठी येरवडा परिसरात जागादेखील निश्चित करण्यात आल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
ही अकादमी प्रत्यक्ष प्रशिक्षण देणाऱ्या साधनसामग्रीसह अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत असणार आहे. वाहतूक विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना एक महिन्याचे येथे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामध्ये वाहतुकीच्या संदर्भातील कायद्याची माहिती, नियम, त्याची अंमलबजावणी तसेच रस्त्यावर काम करत असताना नागरिकांसोबत कसे वागायचे, कसे बोलायचे, वाहतुकीचे नियम याबाबतीत येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच बरोबर शालेय विद्यार्थी, स्कूल बसचालक, रिक्षाचालक यांच्यासारख्या खासगी व्यक्तींनासुद्धा येथे प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची शाळा...
वाहतूक नियमांचे सतत उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांची शाळा वाहतूक प्रशिक्षण अकादमीत भरणार आहे. नियम मोडल्यानंतर त्यांना येथे ठराविक कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे एकप्रकारे पोलिस त्यांची शाळाच येथे घेणार आहेत शिवाय वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
ट्रॅफिक ट्रेनिंग अकॅडमीबाबत आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला मान्यता मिळाली आहे. लवकरच ही अकॅडमी येरवडा येथे सुरू होणार आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशात गुणवत्तेवर आधारीत एक चांगल्याप्रकारची ही संस्था असेल. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त