पुणे : संततधार पावसामुळे मंगळवारी शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने खड्ड्यांमधून वाट काढत वाहने चालविताना पुणेकरांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागली. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील अनेक भागांत वाहतूककोंडीचा फटका बसला. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न कायमचा सोडवणे वाहतूक पोलिसांना शक्य नाही का? असा सवाल संतप्त प्रवाशांनी केला.पुणे शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनला आहे. शहरात काही वर्दळीच्या रस्त्यांवर सकाळ व सायंकाळी वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांत इतर वेळीही वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी सकाळी पाऊस सुरू झाल्याने शहराच्या मध्यवस्तीतील नागरिकांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. नागरिकांना काही मीटर अंतर ओलांडण्यासाठीही बराच वेळ लागत होता. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतच होत्या. त्यामुळे नागरिकांनी चारचाकी वाहनेदेखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आणली होती. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने दिवसभर वाहतूक संथ झाली होती. या भागांतील रस्त्यांवर कोंडीचा फटका
शहरात जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता, डेक्कन परिसर, टिळक रस्ता, दांडेकर पूल, सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, कात्रज चौक, गणेशखिंड रस्ता, वाकडेवाडी, बंडगार्डन रस्ता, आरटीओ चौक, अरोरा टॉवर चौक, गणेशखिंड रस्ता, संगमवाडी, बोपोडी, विमाननगर चौक, मुंढवा चौक, पूलगेट परिसर, वानवडी रस्ता, लुल्लानगर, नवले पूल, धायरी, वारजे, हडपसर, वाघोली, विश्रांतवाडी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिस भर पावसात रस्त्यावर
सकाळी सुरू झालेला पाऊस दुपारी बारानंतर काही ठिकाणी वाढला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी भरपावसात कात्रज, स्वारगेट, अलका चौक, शिवाजीनगर या ठिकाणी वाहतूक पोलिस कार्यरत होते. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला; परंतु थोड्याशा पावसामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने नागरिकांना मात्र गैरसोयीचा फटका सहन करावा लागला.