Pune traffic : वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 09:13 IST2025-11-27T09:12:41+5:302025-11-27T09:13:08+5:30
- महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती

Pune traffic : वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना सुरू
पुणे :पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरी जीवन बिघडत असून, या समस्येवर तत्काळ आणि शिस्तबद्ध उपाययोजनांची गरज असल्याचे आहे. तसेच पुणे हे देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक कोंडी असलेले शहर बनले असून, अनियंत्रित वाढ, पुनर्विकासाचा वेग आणि अपुरी रस्ते क्षमता यामुळे कोंडीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना वेगाने सुरू आहेत, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
पुणे जिल्हा गृहनिर्माण संस्थेच्या वतीने ‘चालत, बस, सायकल अन् मेट्रो’तर्फे जनसंवादाचे आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी महामेट्रो व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, उपप्राचार्य पूनम रावत, अनिता काणे उपस्थित होते.
नवल किशोल राम म्हणाले, शहराच्या गतिशीलतेसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅननुसार अनेक प्रकल्प राबवले जाणार असून, डीपी रस्त्यांचा विस्तार, कात्रज–कोंढवा रस्त्याचे काम, फुटपाथ दुरुस्ती, तसेच पादचारी व सार्वजनिक वाहतूक प्राधान्य धोरणाची अंमलबजावणी वेगाने होणार आहे. वाहतूक सुधारण्यासाठी नागरिकांचा सहभाग, वाहतुकीतील शिस्त, लेन-ड्रायव्हिंग आणि पोलिस व मनपा यांच्यातील समन्वय साधण्यात येणार आहे. यामुळे पुढील दोन वर्षांत शहरातील कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल.
सार्वजनिक वाहतुकीस प्राधान्य द्यावी :
शहरातील ५० टक्क्यांहून अधिक वाहतूक खासगी वाहनांवर आधारित असून, ती १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. यासाठी वॉकिंग, सायकलिंग, बससेवा आणि मेट्रोलाच मुख्य वापर करण्यावर भर देणे गरजेच आहे. सार्वजनिक ठिकाणी पार्किंग धोरण अपुरे असून, त्यामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. खासगी वाहनांना आळा घालण्यासाठी पार्किंगचे नियमन, कंजेशन प्राइसिंग यांसारख्या पर्यायांचा विचार सुरू आहे. दुसरीकडे ‘पीएमपीएमएल’कडील बस ताफ्यातील बिघाडांचे प्रमाण कमी करून सेवेत व्यावसायिकता आणण्याचे विचार आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत फीडर सेवा, सुरक्षित पादचारी मार्ग आणि सायकल ट्रॅक यामुळे नागरिकांना सार्वजनिक वाहतूक स्वीकारणे सोपे जाईल, असा विश्वास श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.