Pune Traffic : वाहतूक कोंडीतून सुटका होणार..! हिंजवडीतून थेट मुंबईसाठी शिवनेरी धावणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:18 IST2026-02-03T16:13:00+5:302026-02-03T16:18:12+5:30
- शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, हिंजवडी येथूनच थेट मुंबईसाठी एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

Pune Traffic : वाहतूक कोंडीतून सुटका होणार..! हिंजवडीतून थेट मुंबईसाठी शिवनेरी धावणार?
पुणे :पुणे-मुंबई दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी प्रवास करतात. मात्र, पुण्यात प्रवेश केल्यानंतर स्वारगेट किंवा पुणे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी दीड ते दोन तासांचा विलंब होत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, हिंजवडी येथूनच थेट मुंबईसाठी एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. त्याबाबतचा प्रस्ताव एसटी महामंडळाने पाठवला आहे.
सध्या पुण्यातून दादर, बोरिवली आणि ठाण्यासाठी ई-शिवनेरी व ई-शिवाई या वातानुकूलित ई-बस सेवा सुरू आहेत. स्वारगेट आणि पुणे स्टेशन येथून दिवसाला सुमारे १२४ फेऱ्या होत असून, तेवढ्याच फेऱ्या मुंबईहून पुण्याकडे येतात. मात्र, एक्स्प्रेस-वे आणि शहरातील वाहतूक कोंडीमुळे या बस अनेकदा नियोजित वेळेपेक्षा एक ते दीड तास उशिराने पोहोचतात. विशेषतः वाकड चौकापासून स्वारगेट व पुणे स्टेशनपर्यंत वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतो. त्यामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी प्रवासी व प्रवासी संघटनांकडून हिंजवडी येथूनच एसटीच्या काही फेऱ्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत एसटी प्रशासनाने हिंजवडी परिसरातून थेट मुंबईसाठी एसटी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ पुढील काही महिन्यांत सुरू होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत जाणारा वेळ वाचून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हिंजवडी एसटी सेवेचे फायदे :
पुणे शहरातील वाहतूक कोंडीत होणारा विलंब टळणार
पुणे-मुंबई प्रवासाचा किमान एक तास वेळ वाचणार
ई-बससाठी हिंजवडीतच चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव
वाहतूक कोंडीत वाचलेल्या वेळेत बस चार्जिंग शक्य
भविष्यात बस फेऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता
मेट्रो लाईन-३ मुळे हिंजवडीपर्यंत पोहोचणे अधिक सोपे
मेट्रोमुळे हिंजवडी एसटी सेवेचा फायदा होणार
हिंजवडीतून मुंबईसाठी एसटी सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. पुढील काही महिन्यांत एसटी सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. - अरुण सिया, विभाग नियंत्रक