दुबई, बँकॉकपेक्षा पुणे ते दिल्लीचा प्रवास महाग; प्रवाशांचे 'दिवाळे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:25 IST2025-10-11T10:23:58+5:302025-10-11T10:25:25+5:30
- ऐन दिवाळीमध्ये दरवाढ; देशांतर्गत दिल्ली, बंगळुरू, हैदराबादला जाण्यासाठी सरासरी २० हजार रुपये तिकीट दर, नियोजन कसे करणार ?

दुबई, बँकॉकपेक्षा पुणे ते दिल्लीचा प्रवास महाग; प्रवाशांचे 'दिवाळे'
पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांचे ‘दिवाळे’ काढायचे ठरविलेले दिसत आहे. देशांतर्गत विमानसेवा महागली असून, दिवाळीत पुण्याहून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या प्रमुख शहरांना जायचे असेल, विमान तिकिटाला आजच्या तिकिटापेक्षा दीडपट भाडे द्यावे लागणार आहे. एकीकडे पुण्यातून दुबई, बॅंकाॅक येथील प्रवास अवघ्या २० हजार रुपयांपर्यंतच्या तिकिटांत करता येतो. तर देशांतर्गत दिल्ली, बंगळुरू, हैदराबादला जाण्यासाठी सरासरी २० हजार रुपये तिकीट दर आहे. यामुळे प्रवाशांचे दिवाळे निघणार आहे.
दिवाळीच्या सुट्टीत लोक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. सणाच्या निमित्ताने आपल्या गावी-शहरी परततात. या पार्श्वभूमीवर तिकिटांचे दर वाढविले जातात. विमान कंपन्यांच्या तिकीट दरवाढीचा फटका प्रवाशांना बसत आहे. वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या वेबसाइट्सवरून माहिती घेतल्यावर असे दिसून आले की, पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट दि. १० ऑक्टोबर रोजी १० हजार रुपये असून, दि. १८ ऑक्टोबर रोजी ते १५ हजार ते २६ हजार रुपये आकारले जात आहे. तर पुणे ते बंगळुरू प्रवासासाठी दि. १० ऑक्टोबर रोजी ७ हजार रुपये असून, १८ ऑक्टोबर रोजी १४ हजार ते २२ हजार रुपये तिकीट आहे. यामुळे दिवाळीच्या प्रवाशांना जवळपास दुप्पट भाडे मोजावे लागणार आहे. यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, गर्दीच्या काळात तिकीट दरावर सरकारने नियंत्रण गरजेचे आहे.
पुण्यातून सर्वाधिक विमाने दिल्लीला
पुण्यात दररोज दिल्लीला जाणाऱ्या विमानांची संख्या जास्त आहे. त्यानंतर बंगळुरूचा क्रमांक लागतो. दिवाळीच्या काळात ऐनवेळी रेल्वेचे तिकीट मिळत नाही. त्यामुळे अनेक जण विमान प्रवास निवडतात. साहजिकच विमान प्रवासी संख्या वाढते. या संधीचा फायदा घेऊन विमान कंपन्यांकडून तिकीट दरात दीडपटपेक्षा जास्त तिकीट भाडे वाढविण्यात आले आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसणार आहे. पुण्यातून दिल्लीला दररोज सरासरी २० विमानांची उड्डाणे होतात, तर बंगळुरूला १५ ते १७ विमाने जातात.
अशी आहे दरवाढ : (सरासरी)
मार्ग --- १० ऑक्टोबर---- १८ ऑक्टोबर
पुणे - दिल्ली-- १०,२५० -- १७,४००
पुणे - बंगळुरू -- ५,७५०-- १३,४००
पुणे - कोलकाता-- १७,०००--२५,५००
पुणे - चेन्नई-- ५,०००--१०,०००
पुणे - जयपूर -- १०,०००-- १४,५००
विमान कंपन्यांकडून गर्दीच्या वेळी तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येते. पर्याय नसल्याने प्रवास करावा लागतो. दोन महिन्यांपूर्वी तिकीट काढले तर भाडे कमी असते. परंतु प्रवासाचे नियोजन नसते. त्यामुळे नाइलाजाने जास्तीचे तिकीट दर देऊन प्रवास करावा लागतो. - चैतन्य जोशी, प्रवासी
व्यवसायाच्या निमिताने अनेक वेळा विमान प्रवास होतो. परंतु गर्दी नसताना तिकीट दर कमी असते. परंतु सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल, विमान तिकीट दरात भरमसाट वाढ करण्यात येते. यावर सरकारने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ८ ते १० हजारांत होणाऱ्या प्रवासासाठी दिवाळीच्या काळात १५ हजारांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. - आदित्य सोळंकी, व्यावसायिक