बारामती : उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाचा पुढचा धुरा कोण सांभाळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, आज त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सामाजिक कार्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी तेर (जि. धाराशिव) येथे झाला. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या बहीण असलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकीय वारसा जन्मत:च लाभला. १९८५ मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला. विवाहानंतर काटेवाडी (ता. बारामती) येथे स्थायिक झाल्यावर त्यांनी सामाजिक कार्याची वाट धरली. काटेवाडीमध्ये ग्रामस्वच्छता चळवळीची मुहूर्तमेढ रोवताना पहाटे पाच वाजता स्वतः हातात खराटा घेऊन कामाला सुरुवात करणाऱ्या सुनेत्रा पवार यांनी संपूर्ण गावालाच या अभियानात सहभागी करून घेतले. त्यांच्या प्रेरणेतून काटेवाडी ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम क्रमांकावर आले. या कार्याची दखल घेत देश-विदेशातून अभ्यासकांनी काटेवाडीला भेट दिली. याच कार्यामुळे सुनेत्रा पवार यांना सार्क देशांच्या साकोसान परिषदेत सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला. यानंतर बारामतीत ‘एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया’च्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम त्यांनी राबविले. या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय आणि नेतृत्वात्मक सहभाग राहिला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश झाला. त्यापूर्वी पवार कुटुंबातील प्रत्येक निवडणुकीत त्या प्रचारात आघाडीवर असत आणि अनेक विक्रमी विजयांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला, तरी त्या खचल्या नाहीत. जनसेवेत सक्रिय राहिल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. राज्यसभा खासदार म्हणून काम करत असतानाच त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर विराजमान होण्याचा मान मिळाला.
गाईगुरांपासून राजकारणापर्यंतची साथ
विवाहानंतर अजित पवार यांच्यासोबत शेतकाम, पोल्ट्री व्यवसाय ते गाईगुरे सांभाळणे, दूध काढणे अशी सर्व कामे सुनेत्रा पवार यांनी आवडीने केली. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत घर सांभाळणे, कठीणप्रसंगी साथ देणे आणि सल्लामसलत करणे, ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे निभावली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. या आधी कोणत्याही महिलेने या पदावर काम केलेले नाही. पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचे काम आता त्या करणार आहेत.
Web Summary : Following her husband's legacy, Sunetra Pawar is set to become Maharashtra's first woman Deputy Chief Minister. Her journey from social work to politics, marked by grassroots initiatives and support for Ajit Pawar, culminates in this historic role. This marks a significant milestone for women in Maharashtra politics.
Web Summary : अपने पति की विरासत को आगे बढ़ाते हुए, सुनेत्रा पवार महाराष्ट्र की पहली महिला उपमुख्यमंत्री बनने के लिए तैयार हैं। जमीनी स्तर की पहल और अजित पवार के समर्थन से चिह्नित सामाजिक कार्य से राजनीति तक की उनकी यात्रा, इस ऐतिहासिक भूमिका में परिणत होती है। यह महाराष्ट्र की राजनीति में महिलाओं के लिए एक महत्वपूर्ण मील का पत्थर है।