२०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त ८३ दिवस ऊस गाळप, यंदा उत्तर प्रदेश आघाडीवर..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:11 IST2025-03-18T13:10:55+5:302025-03-18T13:11:51+5:30
- किमान १४० दिवस गाळप सुरू असल्यासच साखर कारखान्याचे अर्थकारण टिकू शकेल; यंदा ८० लाख टन साखर उत्पादन

२०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात फक्त ८३ दिवस ऊस गाळप, यंदा उत्तर प्रदेश आघाडीवर..!
पुणे :उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता महाराष्ट्र आणि कर्नाटकसह संपूर्ण देशाचा गाळप हंगाम मार्च अखेरपर्यंतच चालेल. तर उत्तर प्रदेशातील धुराडी एप्रिल मध्यापर्यंत बंद होतील. सुमारे २०० साखर कारखाने असणाऱ्या महाराष्ट्रात यंदाचा गाळप हंगाम सरासरी ८३ दिवसच चालला आहे. कोणताही कारखाना किमान १४० ते १५० दिवस चालला तरच त्याचे अर्थकारण टिकते. यंदा ८३ दिवसांच्या हंगामातून केवळ ८० लाख टन साखर उत्पादन झाल्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या खर्चाच्या तुलनेत ८३ दिवसांचा हंगाम याचे गणित बसवणे कठीण असल्याचे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
देशातील २०२४-२५ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी ८० टक्के साखर उत्पादन होणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांतील उभ्या उसाची अवस्था आणि त्यातून होणाऱ्या अपेक्षित घटत्या साखर उत्पादनाची आकडेवारी याविषयी प्रमुख आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी चिंता व्यक्त केली होती. राष्ट्रीय पातळीवरील एका साखर कारखाना संघटनेने यंदा देशात ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज केंद्र सरकारला दिला. त्यानुसार केंद्र सरकारने धोरण निश्चित करून २० लाख टन साखर निर्यातीच्या मागणीनुसार, पहिल्या टप्प्यात १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. यामुळे साखर दर सुधारण्यास निश्चित मदत झाली. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार देशात केवळ २५९ लाख टन साखर उत्पादन होऊ शकते, अशी माहिती पाटील यांनी दिली.
यंदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उसाला विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे साखर उतारा घटला. निवडणुकांमुळे महाराष्ट्र, कर्नाटकात नवा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू झाला. दोन्ही राज्यांतील गाळप १५ ऑक्टोबरला सुरू झाले असते, तर यापेक्षा भयानक परिस्थिती समोर आली असती, असेही ते म्हणाले.
महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांच्या मते गतवर्षी झालेल्या समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे उसाची नवी लागण मोठ्या प्रमाणावर झाली आहे. प्रमुख जलाशयांतील पाण्याच्या साठ्यामुळे यंदा तुटलेल्या उसाचा खोडवा पुढील गाळप हंगामाच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल. त्यातच ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका आणि त्या पाठोपाठ भारतीय हवामान खात्याने यंदाचे भारतातील पाऊसमान समाधानकारक असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे घडल्यास उभ्या उसाच्या वाढीला आणि साखर उत्पादनाला चालना मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.