पुण्याचे स्टेअरिंग ‘ति’च्या हाती : रेल्वे, पीएमपी एसटीत महिला राज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 12:21 PM2019-12-25T12:21:44+5:302019-12-25T12:33:29+5:30

रेल्वे, एसटी आणि पीएमपी... सार्वजनिक वाहतुकीची तीन महत्वाची चाके...

Pune steering in the hands of 'women' | पुण्याचे स्टेअरिंग ‘ति’च्या हाती : रेल्वे, पीएमपी एसटीत महिला राज

पुण्याचे स्टेअरिंग ‘ति’च्या हाती : रेल्वे, पीएमपी एसटीत महिला राज

Next
ठळक मुद्देतिन्ही ठिकाणी पहिल्यांदाच महिला अधिकारी रेणु शर्मा, नयना गुंडे आणि यामिनी जोशी या महिला अधिकारी नियुक्तरेल्वेगाड्यांमधील महिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणांना सुचना प्रवाशांची सुरक्षितता, त्यांचे समाधान आणि रेल्वे गाड्यांच्या वेळा पाळणे या गोष्टींचा प्राधान्यएसटी महामंडळाच्या पुणे विभागात केवळ पुणे जिल्ह्याचा समावेश पुण्यातून कोल्हापुर, नाशिक, औरंगाबादसाठी ईलेक्ट्रिक बससेवा सुरू

राजानंद मोरे - 
पुणे : रेल्वे, एसटी आणि पीएमपी... सार्वजनिक वाहतुकीची तीन महत्वाची चाके. यापैकी एक चाक थांबले तरी वाहतुक व्यवस्था कोलमडते. त्यामुळे ही चाके सतत गतीमान असावी लागतात. त्यासाठी अव्याहतपणे सतर्क राहण्याशिवाय पर्याय नाही. पुण्यात आतापर्यंत ही जबाबदारी पुरूष अधिकाऱ्यांच्या खांद्यावर होती. पण सध्या पुण्याच्या वाहतुकीचे स्टेअरिंग महिला अधिकाऱ्यांच्या हातात आले आहे. रेल्वे, पीएमपी आणि एसटी या तिनही ठिकाणी पहिल्यांदाच अनुक्रमे रेणु शर्मा, नयना गुंडे आणि यामिनी जोशी या महिला अधिकारी नियुक्त आहेत. 
            वाहतुक हे क्षेत्रामध्ये नेहमीच पुरूषांची मक्तेदारी राहिली आहे. चालकांपासून वाहतुकदार, परिवहन विभागाचे अधिकारी, मंत्र्यांपर्यंत पुरूषांचा वरचष्मा असतो. या क्षेत्रातील महिलांचा वावर नगण्य दिसतो. पण आता त्याला पुणे अपवाद ठरले आहे. रेल्वे, पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि एसटी महामंडळ या तिनही महत्वाच्या वाहतुक विभागांच्या प्रमुखपदी महिला अधिकारी आहेत. हा योगायोग असला तरी संबंधित महिला अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेनुसारच त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केवळ पुणेच नव्हे तर जगभरातील अनेक शहरांमध्ये वाहतुक कोंडीचा प्रश्न नियोजनकर्त्यांना सतावत आहे. त्यावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करणे, हा त्यावरचा एक प्रमुख पर्याय मानला जातो. त्यादृष्टीने पुणे शहरासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या बससेवेला खुप महत्व आहे. आजवर ‘पीएमपी’ची प्रमुख जबाबदारी पुरूष अधिकाºयांकडे देण्यात आली होती. पण जवळपास दोन वर्षांपुर्वी नयना गुंडे यांच्या रूपाने ‘पीएमपी’ला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून पहिल्या महिला अधिकारी मिळाल्या. आतापर्यंत त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे सांभाळत ‘पीएमपी’ची बससेवा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले आहेत. 


             महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या पुणे विभागाच्या विभाग नियंत्रक म्हणून यामिनी जोशी कार्यरत आहेत. नाशिक येथे विभाग नियंत्रक म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी होत्या. पुण्यामध्ये त्या दीड वर्षांपासून असून विभागाचा कार्यभार कुशलपणे सांभाळत आहेत. मागील महिनाभरापासून मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक म्हणून रेणू शर्मा यांच्याकडे जबाबदारी आली आहे. रेल्वेसाठी पुणे विभाग महत्वाचा आहे. शर्मा यांनी यापुर्वी रेल्वेमध्ये देशभरात विविध वरिष्ठ पदांवर काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कार्यकुशलतेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

---------------
महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी...
प्रवाशांची सुरक्षितता, त्यांचे समाधान आणि रेल्वे गाड्यांच्या वेळा पाळणे या गोष्टींचा प्राधान्य असल्याचे रेल्वेच्या रेणु शर्मा सांगतात. त्याचबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही त्यांचा भर राहणार आहे. त्यानुसार पुणे विभागातील प्रत्येक स्थानकावर महिला पोलिसांची गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, चांगली प्रकाशव्यवस्था वाढविण्यात येणार आहे. तसेच महिला स्वच्छतागृह, आराम कक्ष यांसह महिलांचा अधिक वावर असलेल्या ठिकाणीही सीसीटीव्ही बसविण्याचा विचार आहे. रेल्वेगाड्यांमधील महिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणांना सुचना दिल्याचे शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

.....................

पीएमपी होतेय सक्षम
नयना गुंडे यांनी पीएमपीचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिला महत्वपुर्ण निर्णय महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याचा घेतला. त्यानंतर विशेष बसची संख्या वाढत गेली. तसेच ईलेक्ट्रिक बससह, मिडी बस व चारशे सीएनजी बस पीएमपीच्या ताफ्यात येण्यासाठी त्यांनी खुप प्रयत्न केले. त्यामुळे सध्या पीएमपीचा ताफा सक्षम होऊ लागला आहे. ‘वाहतुक क्षेत्रात नेहमीच पुरूषांचे वर्चस्व राहिले आहे. पण तिनही ठिकाणी महिला अधिकारी असल्याने हे महिला सक्षणीकरणाचे उत्कृष्ठ उदाहरण आहे. तसेच महिलांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी हे महत्वाचे आहे. पीएमपी अधिक सक्षम करण्यासाठी नेहमीच प्रयत्न सुरू आहेत,’ असे गुंडे यांनी सांगितले.

................

ई-बससाठी पुण्याला प्राधान्य


एसटी महामंडळाच्या पुणे विभागात केवळ पुणे जिल्ह्याचा समावेश होतो. पण हा विभाग इतर विभागांच्या तुलनेत नेहमीच वरचढ ठरत आला आहे. त्याला अधिक सक्षम करण्यासाठी यामिनी जोशी यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. ‘सुरक्षित आणि वेळेवर प्रवास’ ही प्रवाशांची गरज ओळखून बस वाहतुकीचे नियोजन केले जात असल्याचे जोशी यांनी सांगितले. त्यांच्या काळात स्वारगेट ते मुंबई विमानतळ बससेवा, शिवशाही बससेवेत वाढ, विविध सण-उत्सवामध्ये जादा बसचे यशस्वी नियोजन, शिवाजीनगर बसपोर्टसाठी प्रयत्न आणि आता पुण्यातून कोल्हापुर, नाशिक, औरंगाबादसाठी ईलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यासाठी यश मिळाले आहे.

Web Title: Pune steering in the hands of 'women'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.