शिक्रापूर एन्काउंटर; दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस अन् 'ते' ७२ तास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 14:05 IST2025-09-01T14:03:53+5:302025-09-01T14:05:23+5:30

Shikrapur Encounter: कसा घडला थरार? 'त्याने' पाणी पिलं अन् नंतर कॅमेऱ्याकडे बघितलं...

Pune: Satara Knifepoint Robbery Accused Killed In Police Encounter In Shirur Taluka | शिक्रापूर एन्काउंटर; दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस अन् 'ते' ७२ तास!

शिक्रापूर एन्काउंटर; दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस अन् 'ते' ७२ तास!

दत्ता यादव
लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : साताऱ्यात कधी नव्हे ते भलतंच घडलं होतं. गुन्हेगारीचं अक्राळ-विक्राळ स्वरूप कोयता गँगच्या निमित्तानं अवघ्या आठवड्यात सीसीटीव्हीमुळे समोर आलं. हे पाहून सातारकरांचेच नव्हे तर, पोलिसांचंही रक्त सळसळलं. आधी पुरावे मग कारवाई या युक्तीप्रमाणे पोलिसांनी शोधमोहीम राबविली. दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस आणि ७२ तासांत पोलिसांनी जे केलं, ते अत्यंत थरारक अन् रोमांच आणणारं होतं.

कोयता गँगनं ज्या पद्धतीने महिलेचा पाठलाग केला, ते पाहून पोलिसांना सुरुवातीला वाटलं, हे आरोपी प्रतापसिंहनगरातील असू शकतात. तब्बल सव्वाशेहून अधिक पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. आरोपी ज्या रस्त्याने आले तेथील सर्व सीसीटीव्ही तपासण्यास पोलिसांच्या पथकानं सुरुवात केली.

अशी झाली पोलखोल
प्रत्येक सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले होते; परंतु, चेहरे झाकले होते. दुचाकीचा नंबर मिळाला; परंतु, तो खोटा निघाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्या मार्गाने पळाले तेथील ३५ किलोमीटरपर्यंतचे तब्बल दोनशेहून अधिक सीसीटीव्ही तपासले तेव्हा एका सीसीटीव्हीने या गुन्ह्याची पोलखोल केली.

'हाच' कटाक्ष पुढे एन्काउंटरपर्यंत पोहोचला
कोयता गँगमधील तिघे आरोपी लोणंदकडे गेले. त्या तिघांपैकी लखन भोसलेने पाणी पिण्यासाठी तोंडाचं काळं कापड काढलं. तोंड वर करून पाणी पिताना त्यानं तेथील सीसीटीव्हीकडेही एक कटाक्ष टाकला. हाच कटाक्ष पुढे त्याच्या एन्काऊंटरपर्यंत पोहोचला.

असं झालं एन्काउंटर !
सीसीटीव्हीत लखन भोसले याचा चेहरा स्पष्ट दिसल्यानंतर, त्याची माहिती घेत एका साथीदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांचे पथक पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरला गेले. सायंकाळी सातच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक श्याम काळे, हवालदार सुजित भोसले, तुषार भोसले यांनी आरोपींच्या घरापासून दूर गाडी उभी करत सर्व दबक्या पावलाने घराजवळ पोहोचले. पोलिस आल्याचे पाहताच एक आरोपी ओरडला. लखन भोसले 'काय झालं?' म्हणून उठून पोलिसांकडे पाहत होता. हवालदार सुजित भोसले यांनी त्याचा हात पकडला. याचवेळी लखन याने खिशातून चाकू काढून त्यांच्या हातावर मारला. त्यामुळे त्यांचा हात निसटला. हवालदार तुषार भोसले यांच्याशी त्याची झटापट सुरू होती. चाकू घेऊन तो वार करत होता. याचवेळी त्याच्यावर गोळी झाडण्यात आली अन् कोयता गँगची दहशत अखेर पोलिसांनी संपुष्टात आणली.

Web Title: Pune: Satara Knifepoint Robbery Accused Killed In Police Encounter In Shirur Taluka