पुणे-सातारा महामार्ग अवाढव्य होर्डिंग्जच्या विळख्यात;दुर्घटनेपूर्वी कारवाई करण्याची मागणी, प्रशासनाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:23 IST2025-05-24T15:22:33+5:302025-05-24T15:23:44+5:30
- लोखंडी पाइप गंजलेले अन् वाकलेले; फलकांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता : अनधिकृत अवाढव्य होर्डिंग्जच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ

पुणे-सातारा महामार्ग अवाढव्य होर्डिंग्जच्या विळख्यात;दुर्घटनेपूर्वी कारवाई करण्याची मागणी, प्रशासनाचे दुर्लक्ष
भोर -पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते सारोळा हद्दीतील रस्त्यालगत अनधिकृत अवाढव्य होर्डिंग्जची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे होर्डिंग्जला कोणत्याही प्रकाराची परवानगी नाही, ना हरकत दाखला नाही. स्ट्रक्चरल ऑडिट नाही. त्यांच्यावर कारवाई कधी होणार ? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी घाटकोपर मुंबई येथील दुर्घटनेनंतर प्रशासन कारवाई केली होती. मात्र, मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज वाढले असून, अनधिकृत होर्डिंग्ज कधी काढणार ? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. या भागातील रस्त्याच्या दुतर्फा अनेक कंपन्यांची मोठाली, अवाढव्य होर्डिंग्ज उभी आहेत. त्यासाठी मोठाले लोखंडी पाइप, अँगल, पत्रा, रॉडचा वापर केला आहे. त्याची नियमितपणे देखभाल अथवा दुरुस्ती केली जात नाही.
अनेक फलकांचे लोखंडी पाइप गंजले असून, वाकले आहेत. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अशा धोकादायक फलकांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बहुतेक फलक गावाच्या जवळ असून, तेथे नागरिकांची वर्दळ असल्याचे आढळते. दुर्घटना घडल्यावर अनधिकृत फलकांवर प्रशासन कारवाई करणार का?
मागील वर्षी भोर ते कापूरहोळ, भोर ते शिंदेवाडी, भोर ते वरंध घाट भोर-अंबाडे, भोर मळे, भोर-महुडे या दहा मार्गावरील अनधिकृत उभ्या केलेल्या अनधिकृत फलकांची माहिती घेत मार्गावरील होर्डिंग्जचे सर्वेक्षण करून सर्वेक्षणानंतर संबंधिताला नोटिसा बजावून कारवाई करण्यात आली होती. मात्र, पुन्हा मोठ्या प्रमाणात फलक उभारले आहेत. यावेळी पुन्हा नोटिसा देऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले. पुणे-सातारा महामार्ग कापूरहोळ भोर, भोर-महाड रस्त्यावर आणि तालुक्यात हॉटेल, जमीन खरेदी-विक्री राजकीय जाहिरातीसाठी विविध कंपन्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावलेले आहेत. यातील बहुतांशी होर्डिंग्ज बेकायदेशीर लावलेले आहेत. मात्र, याबाबत काहीच महिती प्रशासनाकडे नाही. तालुक्यात खरेदी-विक्री राजकीय जाहिरातीसाठी विविध कंपन्यांनी बेकायदेशीर होर्डिंग्ज लावले आहेत. यावर पीएमआरडीए, बांधकाम विभाग, भौर नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीने कारवाईची मागणी होत आहे.
होर्डिंगवर कारवाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविले
शिंदेवाडी ते सारोळा दरम्यान असलेले सर्व होर्डिंग्ज पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येतात. येथे आकाशचिन्ह स्थापन करण्यात आला आहे. याबाबत पीएमआरडीएचे तहसीलदार कारवाई करतात. या कारवाईबाबत संपर्क साधला असता अनधिकृत होर्डिंग कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे सांगितले.
होर्डिंग्जबाबत नियम
वाहन चालकांच्या डोळ्यांवर तिरपी येईल अशा मनाई आहे. इमारतीवर २० फुटांपेक्षा अधिक उंची नसावी, स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या दाखल्याशिवाय परवानगी नाही. गटविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय उभारू नये. ठरावीक कालावधीनंतर स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे, फलकाचा आकार १० बाय २० पासुन २० बाय १० फुटापासून ३० बाय ४० फुटांपर्यंत नियम आहे. निऑनचे फलक रात्री दहानंतर बंद ठेवावेत.
दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही
या परिसरातील फलकांची नियमितपणे देखभाल अथया दुरुस्ती केली जात नाही. अनेक फलकांचे लोखंडी पाइप गंजले असून, वाकले आहेत. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अशा फलकांमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भोर- कापूरव्होळ रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठे अनधिकृत होडिंग लावले आहे. अनेक होर्डिंग धोकादायक असून, ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला न घेता लावले आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. - सायली महेंद्र साळुंके, सरपंच संगमनेर-माळवाडी