पुणे-सातारा महामार्गावर किकवीजवळ लक्झरी बसची ट्रकला मागून धडक; जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:50 IST2026-02-12T14:50:30+5:302026-02-12T14:50:55+5:30
अपघातानंतर बसचा चालक स्टेरिंग आणि सीट यामध्ये अडकून बसला होता.

पुणे-सातारा महामार्गावर किकवीजवळ लक्झरी बसची ट्रकला मागून धडक; जीवितहानी टळली
पुणे :पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर किकवी गावाच्या हद्दीत आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास खाजगी लक्झरी बसचा अपघात झाला. पुढे चाललेल्या ट्रकला बसने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर बसचा चालक स्टेरिंग आणि सीट यामध्ये अडकून बसला होता. स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन पथकाच्या मदतीने काही वेळातच त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. चालकाला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते.
घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी आणि वाहतूक विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बस क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेला हलवली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पहाटेच्या वेळेत महामार्गावर वेग नियंत्रण आणि सुरक्षित अंतर राखण्याचे महत्त्व या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.