वधू-वर शोधणाऱ्या पुणेकरांना टार्गेट; विवाह मंडळांच्या तिघांवर गुन्हा, महिला आयोगाच्या दणक्यानंतर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:14 IST2025-10-30T10:13:43+5:302025-10-30T10:14:14+5:30
काही वधू-वर सुचक मंडळांकडून कमालीची आर्थिक फसवणूक, बनावट फोटो, बनावट प्रोफाइल्स तयार करणारे रॅकेट आहे

वधू-वर शोधणाऱ्या पुणेकरांना टार्गेट; विवाह मंडळांच्या तिघांवर गुन्हा, महिला आयोगाच्या दणक्यानंतर गुन्हा दाखल
पुणे: लग्नासाठी विवाह मंडळामध्ये नोंदणी केलेल्या मुला-मुलींच्या फोटोंचे वेगवेगळे प्रोफाइल बनवून त्यातील नाव, जात बदलून त्या प्रोफाइल वधू-वर शोधणाऱ्या कुटुंबीयांना पाठवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विवाह मंडळाच्या संगनमतातून हा प्रकार घडत असल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. विवाहासारख्या अत्यंत महत्त्वाच्या सोहळ्यासाठी वधू-वर शोधणाऱ्या पुणेकरांना टार्गेट करणाऱ्या विवाह मंडळांच्या तिघांवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राज्य महिला आयोगाकडे झालेल्या तक्रारीनंतर आयोगाने याबाबत अहवाल सादर करण्यात आल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिभा योगेश तरसे (रोहिणीनगर, पंचवटी, नाशिक), विद्या देशपांडे आणि निलेश केशव वऱ्हाडे (रा. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ॲड. राजेश रामचंद्र बेल्हेकर (६१, रा. महर्षीनगर, पुणे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार राजेश बेल्हेकर हे त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी मुलगी शोधत होते. ९ मार्च २०२५ रोजी त्यांनी एका वृत्तपत्रात ‘वर पाहिजे’ सदरातील शुभऋषी विवाह मंडळा ची जाहिरात दिसली. त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क केला. सुरुवातीला मंडळाकडून सासवड (जि. पुणे) येथील एका मराठा वधूची माहिती फोटोसह पाठवण्यात आली. बेल्हेकर यांनी आपल्या मुलाचा फोटो आणि माहिती पाठवल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी मुलीकडील पसंती असल्याचा मेसेज आला आणि मंडळाची वेबसाइट व संपर्क साधण्यासाठी ३ हजार ५०० रुपये वार्षिक वर्गणी ऑनलाइन भरण्यास सांगण्यात आले.
बेल्हेकर यांनी काही दिवस विचार करून हा विषय बाजूला ठेवला. मात्र, २ एप्रिल २०२५ रोजी त्यांना याच मंडळाची दुसरी जाहिरात दिसली आणि त्यांनी दुसऱ्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. हा नंबर विद्या देशपांडे यांचा असल्याचे समजले. विद्या देशपांडे यांनी सुरुवातीला दौंड येथील एका वधूची माहिती पाठवून बेल्हेकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, ३ एप्रिल रोजी त्यांनी कात्रज (पुणे) येथील दोन वधूंची माहिती पाठवली आणि वार्षिक वर्गणीची रक्कम ३ हजार ५०० ऐवजी ३ हजार रुपये भरण्यास सांगितली. पैसे भरल्यानंतर विद्या देशपांडे यांनी सर्व पाचही वधूंचे पत्ते आणि संपर्क क्रमांक देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. तगादा लावल्यानंतर त्यांनी दौंड आणि कात्रज येथील दोन वधूंच्या आईचे पत्ते आणि फोन नंबर दिले. धायरी येथील एका वधूचा पत्ता व फोन नंबर तर खोटा असल्याचे नंतर उघड झाले, तर उर्वरित दोन वधूंचे पत्ते त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. याव्यतिरिक्त, मंडळाकडून आलेल्या मेसेजमध्ये एका वधूकडून नकार आल्याचे खोटे कळवण्यात आले. तर पूर्वी त्याच वधूकडून पसंती दर्शवण्यात आली होती.
यावरून विवाह मंडळाचे संगनमत आहे, असे स्पष्ट होते. दोन विवाह मंडळांशी संपर्क साधल्यानंतर मला ज्या मुलींची प्रोफाइल पाठवण्यात आली, त्यांचे फोटो आणि तेच, पण नावे वेगवेगळी असल्याच्या प्रकाराने आम्हाला धक्काच बसला. त्यामुळे या प्रकरणात खोलाशी जाण्याचे ठरवल्यानंतर विवाह मंडळांकडून फसवणूक झाल्याचे समजले. काही वधू-वर सुचक मंडळांकडून कमालीची आर्थिक फसवणूक, बनावट फोटो, बनावट प्रोफाइल्स तयार करणारे रॅकेट आहे. या सर्व विवाह मंडळांना कायदा व नियमांच्या कक्षेत आणले पाहिजे. राज्य महिला आयोगाने माझ्या तक्रारीचे गांभीर्य ओळखल्याने मी त्यांचे आभार मानतो. - राजेश बेल्हेकर, पीडित नागरिक