Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टीबाबत कसे कळाले ? पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिले उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 16:08 IST2025-07-27T16:07:24+5:302025-07-27T16:08:51+5:30
खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्या केल्या होत्या. पहिली पार्टी कल्याणीनगरमधील एका पबमध्ये झाली. तिथे रात्री १.३० पर्यंत पार्टी सुरू होती.

Pune Rave Party : पुण्यातील रेव्ह पार्टीबाबत कसे कळाले ? पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिले उत्तर...
पुणे - शहरातील उच्चभ्रू वर्तुळात मोठ्या थाटात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. खराडी येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या या पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटासह सात जणांना ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई अमली पदार्थ प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत करण्यात आली असून, गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ही धडक कारवाई केली. पोलिसांनी रात्री साडे तीनच्या सुमारास फ्लॅटवर छापा टाकला असता, तेथे ५ पुरुष आणि २ महिला रेव्ह पार्टी करताना आढळून आले. पार्टीमध्ये दारू, हुक्का, कोकेन आणि गांजासदृश्य अमली पदार्थांचा वापर होत असल्याचे उघड झाले.
या ठिकाणी पोलिसांना २.७ ग्रॅम कोकेन, १० मोबाईल फोन्स, दारूच्या बाटल्या, बिअर, हुक्का आणि त्याचे साहित्य आढळून आले. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी हलवले असून, त्यांचे रक्त नमुने देखील घेतले आहेत. याप्रकरणी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ही पार्टी प्रांजल खेवलकर यांनी आयोजित केली होती. प्रांजल खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आहेत.
पोलिस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, शहरातील उच्चभ्रू वर्तुळात होत असलेल्या अशा गैरकायदा कृतींवर पोलिसांचे लक्ष असून, अशा प्रकारांवर कडक कारवाई केली जाईल.