देशात परवडणाऱ्या घरात पुण्याचा दुसरा क्रमांक;रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा सकारात्मक परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:25 IST2025-06-29T14:24:05+5:302025-06-29T14:25:09+5:30

- ‘नाइट फ्रँक इंडिया’च्या अलीकडील अहवालानुसार, देशात सर्वाधिक परवडणारी घरे अहमदाबादमध्ये असली, तरी पुणे यानंतर थेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब पुणेकर गृहखरेदीदारांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.

Pune ranks second in affordable housing in the country; Positive impact of Reserve Bank's interest rate cut | देशात परवडणाऱ्या घरात पुण्याचा दुसरा क्रमांक;रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा सकारात्मक परिणाम

देशात परवडणाऱ्या घरात पुण्याचा दुसरा क्रमांक;रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा सकारात्मक परिणाम

पुणे : वाढत्या घरांच्या किमती आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर घर खरेदी करणे सामान्य नागरिकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीमुळे घर खरेदी थोडीशी परवडणारी झाली असून, याचा विशेष सकारात्मक परिणाम पुणे शहरात दिसून येत आहे. ‘नाइट फ्रँक इंडिया’च्या अलीकडील अहवालानुसार, देशात सर्वाधिक परवडणारी घरे अहमदाबादमध्ये असली, तरी पुणे यानंतर थेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही बाब पुणेकर गृहखरेदीदारांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.

घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याच्या गुणोत्तरावरून परवडणारी घरे असलेल्या शहरांची क्रमवारी नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केली आहे. यात देशातील मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. यानुसार, देशात सर्वाधिक परवडणारी घरे अहमदाबादमध्ये आहेत. तिथे घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याचे प्रमाण १८ टक्के असून, यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. याठिकाणी घरगुती उत्पन्नाच्या तुलनेत गृहकर्जाच्या मासिक हप्त्याचे प्रमाण २२ टक्के आहे.

पुणेकरांसाठी ही बाब निश्चितच समाधानाची आहे की, पुणे हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात परवडणाऱ्या घरांचे शहर ठरले आहे. घरासाठीची गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पुणे हे योग्य शहर ठरू शकते, असे या अहवालातून स्पष्ट होते.

परवडणारी घरे कशी ठरवली जातात?

- शहरातील सरासरी घरांची किंमत, त्यावर आधारित ८० टक्के गृहकर्ज आणि २० वर्षांचा कालावधी हे गृहित धरून मासिक हप्ता निश्चित केला जातो.
- हा हप्ता घरगुती उत्पन्नाच्या टक्केवारीच्या आधारे मोजला जातो.

- सामान्यतः उत्पन्नाच्या ४० टक्क्यांपर्यंतचा हप्ता परवडणारा मानला जातो.
- ५० टक्क्यांपेक्षा अधिक हप्ता असेल, तर बँका कर्ज देण्यास अनुत्सुक असतात.
 
पुढील काळात पुण्यात परवडणाऱ्या घरांची संधी वाढेल?

- रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केल्यामुळे गृहकर्जाचे हप्ते आणखी सुलभ होतील.
- देशातील ६.५ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज आणि पुण्यातील स्थिर नोकरी व आर्थिक संधी यामुळे नागरिकांमध्ये आर्थिक आत्मविश्वास वाढला आहे.

- गुंतवणुकीसाठी पुणे हा सुरक्षित आणि आकर्षक पर्याय ठरत असल्याने गृह खरेदीची पसंती कायम राहणार आहे.

Web Title: Pune ranks second in affordable housing in the country; Positive impact of Reserve Bank's interest rate cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.