Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:50 IST2025-09-09T19:50:15+5:302025-09-09T19:50:29+5:30
पुणे महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवता सुधारली आहे

Pune City: स्वच्छ वायू सर्वेक्षणात देशातील १३० शहरांमध्ये पुण्याचा दहावा क्रमांक
पुणे : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत देशातील १३० शहरांमध्ये 'स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५' करण्यात आले. त्यामध्ये पुणे शहराला दहावा क्रमांक मिळाला आहे. गेल्या वर्षी पुणे शहराला या सर्वेक्षणात २३ वे स्थान मिळाले होते. महापालिकेच्या प्रयत्नांमुळे शहराची हवेची गुणवता सुधारली आहे.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सर्वेक्षणासाठी निश्चित केलेल्या पॅरामीटर्समध्ये बायोमास आणि कचरा जाळण्यामुळे होणारे उत्सर्जन, रस्त्यावरील धूळ, बांधकाम पासून निर्माण होणारे प्रदूषण, वाहनांचे प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण, इतर प्रदूषण, जनजागृती कशी केले जाते. या मुददावर आधारित सर्वक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण एप्रिल २०२४ ते २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत होते. पुणे महापालिकेकडून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास नागरिकांना प्रवृत्त केले जात आहे. याशिवाय, महानगरपालिकेने नवीन खरेदी केलेली आणि भाड्याने घेतलेली सर्व वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. पुणे शहरात जुलै २०२५ पर्यंत ४१ लाख १६ हजार ३१० नोंदणीकृत वाहने रस्त्यावर होती. पुणे शहरात इलेक्ट्रीक वाहनांची संख्या ३३ हजारांहून २५ हजार झाली आहे. पुणे शहरात ७० टक्के रोड हे ग्रीन बेल्ट वर्गातील आहेत. शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावण्यात येत आहे.केंद्र सरकारकडून पुणे महापालिकेला १५ वित्त आयोग अंतर्गत ३९९ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी १६२ कोटी रुपये मिळाले आहेत. यातून पुणे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने वर्षभर विविध उपाययोजना केल्या आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सीएनजी घंटागाड्या, बसेस तसेच इलेक्ट्रिक वाहने, पी.एम.पी.एम.एल. च्या बसेस इत्यादीचा समावेश आहे. स्मशानभूमीमध्ये गॅस तसेच विद्युत दाहिनीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे असे पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी आणि पर्यावरण विभागाचे उपायुक्त संतोष वारूळे यांनी सांगितले.