पुणे जिल्ह्यात पावसाने गाठली सरासरी, आतापर्यंत ६५७ मिलिमीटर पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 20:35 IST2025-09-02T20:34:38+5:302025-09-02T20:35:14+5:30
- सरासरीच्या ९३ टक्के, इंदापूर अद्याप सत्तरीच्या आतच, पीक परिस्थिती उत्तम

पुणे जिल्ह्यात पावसाने गाठली सरासरी, आतापर्यंत ६५७ मिलिमीटर पाऊस
पुणे : जिल्ह्यात जूनमध्ये झालेल्या दीडपट पावसामुळे तीन महिन्यांमध्ये सरासरी भरून काढली असून एकूण ९३ टक्के पाऊस झाला आहे. जुलै व ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीच्या अनुक्रमे ७४ आणि ८१ टक्के इतके आहे. या पावसामुळे पीक उत्तम बहरल्याने चांगले उत्पादन मिळण्याची आशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २०१ टक्के पाऊस मावळ तालुक्यात झाला असून इंदापूर तालुक्यात मात्र ६८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.
यंदा मान्सूनने वेळेवर हजेरी लावली. मात्र, जूनचा शेवटचा आठवडा व जुलैचे पहिले दोन आठवडे पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे जिल्ह्याच्या मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि पश्चिम भागातील तालुक्यांमध्ये भाताच्या पुनर्लागवडीवर परिणाम झाला. अन्य ठिकाणी मात्र, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, उडीद, मूग या पिकांची लागवड वेळेत झाली.
जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १७६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र प्रत्यक्षात २४९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत हा पाऊस १४१ टक्के इतका पडला. जुलै महिन्यात सुरुवातीचे दोन आठवडे पावसाने काही प्रमाणात दडी मारल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले. त्यामुळे सरासरी ३०९ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत प्रत्यक्षात २३० मिलिमीटर पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यातही सुरुवातीचे दोन आठवडे पावसाचे प्रमाण कमी होते. तर त्यानंतरच्या पंधरवड्यात पावसाने हजेरी लावल्याने काहीसा दिलासा मिळाला. ऑगस्टमध्ये सरासरी २२० मिलिमीटर पाऊस पडतो. प्रत्यक्षात १७७ मिलिमीटर अर्थात ८१ टक्के पाऊस पडला.
पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पावसाने दडी मारल्याने इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या पूर्व भागातील तालुक्यांमध्ये पिके सुकू लागली होती. सबंध जिल्ह्यात या काळात केवळ १५ ते २० टक्केच पाऊस झाला होता. मात्र, १५ ऑगस्टनंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. त्यामुळे पीक परिस्थितीमध्ये झपाट्याने बदल होऊन आता पिकांची परिस्थिती उत्तम असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. पश्चिम भागात भाताची लागवड उशिरा झाली तरी आता पीक चांगल्या अवस्थेत आहे. सबंध जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असल्याने उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता काचोळे यांनी यावेळी व्यक्त केली.
मावळ तालुक्यात सर्वाधिक २१० टक्के पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल ११४ टक्के पाऊस खेड व ११३ टक्के पाऊस भोर तालुक्यात झाला आहे. सर्वांत कमी पाऊस इंदापूर तालुक्यात ६८ टक्के झाला असून बारामती व पुरंदर तालुक्यात प्रत्येकी ७७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस
तालुका पाऊस (मिमी) टक्के
हवेली ४५०--८१
मुळशी १३८२--९९.७
भोर ९६२--११३
मावळ २१२७--२०९.८
वेल्हा १८१४--८५
जुन्नर ३०७--८०.८
खेड ४७१--११४.९
आंबेगाव ५६८--१०४.७
शिरूर २३४--१०३.७
बारामती १६०--७७.३
इंदापूर १८३.७--६८.७
दौंड २३२--१०८.७
पुरंदर २५६--७७.६
एकूण ६५७--९३.२