Video : वाढत्या पावसासाठी गटारांची क्षमता दुप्पट करणार;आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 17:33 IST2026-04-03T17:31:33+5:302026-04-03T17:33:52+5:30
- शहरात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे तुंबले होते. त्यामुळे पुणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली.

Video : वाढत्या पावसासाठी गटारांची क्षमता दुप्पट करणार;आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती
पुणे :पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून कमी वेळात जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अनेकदा एका तासात ५० मिमीपासून ते १०० मिमीपर्यंत पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पावसाळी गटारांची वहन क्षमता वाढविण्यासाठी नियमात बदल केला आहे. शहरात पावसाळी गटारांची वहन क्षमता दुप्पट केली जाणार आहे. शहरात यापुढे ६० मिलिमीटर व्यासाच्या पाइप ऐवजी एका तासात ११३ ते १३० मि.मी. पाऊस पडेल, त्यानुसार पावसाळी गटारांच्या वाहनाची क्षमता दुप्पट केली जाणार आहे, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे तुंबले होते. त्यामुळे पुणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक झाली. नवल किशोर राम म्हणाले, अवकाळी पाऊस हा एक तासात १०४ मिमी झाला आहे. दोन ठिकाणी ढगफुटीसारख्या घटना घडल्या आहेत. शहराचा व्याप हा आता पूर्वीपेक्षा वाढलेला आहे. २२७ ठिकाणी कामे करण्याची गरज आहे. त्याला तीन विभागात विभागणी करून कामे करण्यात येईल. २२७ पैकी १२० ठिकाणी जून पूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यात येतील. वर्षानुवर्षे काही ठिकाणी पाणी साचणे, अशा घटना घडत आहेत, त्यांचा यात समावेश आहे. २४ तासांत झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी परवानगी देण्यात येईल. प्रत्येक वॉर्डला दहा लाख निधी कामासाठी देण्यात येतो. परंतु, काही वॉर्डांत कमी-अधिक खर्च लागत आहे.
शहरात अनेक धोकादायक वाडे आहे. एप्रिल पूर्वी त्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. क्षेत्रीय अधिकारी हे दररोज कामावर येण्यापूर्वी दोन तास फिरून त्यांच्या भागातील अडचणीचा आढावा घेण्यात येईल. मी सर्व गोष्टीबाबत आढावा घेत आहे. पुणे शहरात जुनी पावसाळी गटारे लाइन आहे. ही लाइन केवळ १६ टक्के आहे. केंद्र सरकारच्या नव्या निकषानुसार पावसाळी गटारांची व्यवस्था निर्माण करण्याबाबत चर्चा झाली. शहरात सध्या सर्व भागांत ६० मिमी व्यासाच्या गटार आहेत. पावसाचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन यंदापासून १३० मिमी व्यासाच्या पावसाळी गटारांची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. त्याबाबत आराखडा तयार करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
३० टक्के कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा
शहरात रस्ते झाडण्याचे काम व्यवस्थित होत नाही, अनेक ठिकाणी कचरा साचून असतो. त्यामुळे शहर तुंबण्यास हातभार लागत आहे. हा कामचुकारपणा शहरात पूरस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत होत आहेत. तसेच मलनिःसारण विभाग, पथ विभाग यांच्याकडून दैनंदिन कामेही व्यवस्थित केली जात नाहीत. यात सुधारणा केली जाईल. महापालिकेतील ७० टक्के कर्मचारी व्यवस्थित काम करतात, पण ३० टक्के कर्मचारी कामचुकारपणा करतात, असे आयुक्त राम यांनी सांगितले.
झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत
सिंहगड रस्ता भागात नवश्या मारुती मंदिराजवळ झाड पडून रंजना नवनाथ गिरी या महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेच्या कुटुंबाला महापालिकेकडून पाच लाखांची आर्थिक मदत केली जाऊ शकते. त्यासाठी स्थायी समिती, सर्वसाधारण सभेची परवानगी घेतली जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.