पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही; परिस्थिती नियंत्रणात – उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 21:10 IST2025-08-20T21:08:31+5:302025-08-20T21:10:21+5:30
सध्या रेड अलर्ट केवळ घाटमाथा परिसरासाठी लागू असून पुणे शहरात किंवा जिल्ह्यातील इतर भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले

पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही; परिस्थिती नियंत्रणात – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसानंतर सध्या शहर व जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे. आज दुपारपर्यंत सरासरी एक इंच पाऊस नोंदवला गेला असून धरणातील साठ्यात ३ ते ४ टक्क्यांनी घट झाली आहे.
तरीदेखील साठा सुरक्षित असून पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवणार नाही, असा दिलासा प्रशासनाने दिला आहे. आज दुपारी घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व अधिकारी सतर्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले. अचानक रात्री पाऊस झाला तरी धरणे तो साठा करण्यास सक्षम असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली.
अशात पुण्यात माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणेकरांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले, सध्या रेड अलर्ट केवळ घाटमाथा परिसरासाठी लागू असून पुणे शहरात किंवा जिल्ह्यातील इतर भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.