Pune Rain Nnews : नदी पात्रातील पूल पाडला मात्र राडारोडा पात्रातच
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:37 IST2025-06-19T20:35:03+5:302025-06-19T20:37:02+5:30
नदीच्या पलीकडे ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी नदीपात्रात ओंकारेश्वर मंदिराजवळ शनिवार पेठ व वृद्धेश्वर - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पादचारी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता.

Pune Rain Nnews : नदी पात्रातील पूल पाडला मात्र राडारोडा पात्रातच
- हिरा सरवदे
पुणे : नदीच्या प्रवाहाला अडथळा ठरणारा ओंकारेश्वर मंदिरच्या जवळचा शनिवार पेठ आणि वृद्धेश्वार - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा नदीपात्रातील पूल महापालिका प्रशासनाने पाडला. मात्र, पुलाचा राडारोडा पात्रातच पडून आहे. त्यामुळे याला कचरा व जलपर्णी अडकू लागली आहे.
नदीच्या पलीकडे ये-जा करणे सोयीचे व्हावे, यासाठी नदीपात्रात ओंकारेश्वर मंदिराजवळ शनिवार पेठ व वृद्धेश्वर - सिद्धेश्वर घाटाला जोडणारा पादचारी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. मुठा नदीपात्रात सुमारे ५५ वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचा वापर स्थानिक नागरिक वाहने धुणे, मासे पकडणे, तसेच प्राण्यांच्या स्वच्छतेसाठी करत होते. वाहतुकीसाठी पुलाचा वापर होत नव्हता. मात्र, दरवर्षी पावसाळ्यात या पुलामुळे जलपर्णी आणि कचरा अडकतो. हा पूल जीर्ण झाल्याने वापरासाठी सुरक्षित नव्हता. याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला लाखो रुपये खर्च करावा लागत होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पुलाचे लेखापरीक्षण केले. पावसाळ्यात नदीपात्रातील पाण्याला अडथळा निर्माण होत असल्याने हा पूल पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पंधरा दिवसांपूर्वी हा पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. हा पूल पाडला. मात्र, पाडलेल्या पुलाचा राडारोडा नदीपात्रातच टाकून दिला. पुलाचे अवशेष प्रवाहातच अर्धवट अवस्थेत असल्याने पावसाळ्यात प्रवाहाला कचरा, जलपर्णी अडकून अडथळा वाढला आहे.
पाण्यात उतरणारे मशीन उपलब्ध नसल्याने पुलाचा राडारोडा उचलला नाही. पाण्यात उतरणारे मशीन मागविले असून, पुलाचा राडारोडा उचलणे आणि पुलाचे इतर अवशेष काढले जातील. हे काम खात्याकडून सुरू असल्याने या कामाला खर्च नाही. - युवराज देशमुख, मुख्य अभियंता, भवन विभाग, पुणे महापालिका