Pune rain news : पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा येईना अंदाज; वाहनचालक झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:39 IST2025-08-21T14:38:49+5:302025-08-21T14:39:05+5:30
वानवडीमध्ये खड्ड्यांमध्ये आपटून अपघात, दुचाकी अन् चारचाकी वाहनांचे होत आहे मोठे नुकसान; रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही;

Pune rain news : पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा येईना अंदाज; वाहनचालक झाले हैराण
वानवडी : वानवडीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांचे चाक पाण्याने भरलेल्या खड्ड्यात जाऊन अपघात होण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. सतत पडत असलेल्या पावसामुळे वानवडीतील मुख्य व अंतर्गत लहान -मोठ्या रस्त्यांवरील खड्डे पावसाच्या पाण्यात झाकून गेले आहेत. कॅन्टोन्मेंट हद्दीतील भैरोबानाला चौकाकडे जाणाऱ्या प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्यावर खड्डे झाल्याने त्यात पाणी साचते, त्यामुळे या खड्ड्यांमधून वाहन काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे. वानवडी गावठाण, होलेवस्ती, केदारीनगर, वानवडी बाजार येथील रस्ते, आझादनगर, फातिमानगर, मम्मादेवी चौक, हिंदुस्थानी चर्च कडून रेसकोर्स कडे जाणारा रस्ता अशा अनेक भागातील रस्त्यांवर असलेले खड्डे पाण्याने भरले आहेत.
वाहनचालकांना या खड्ड्यांमधून वाहन काढणे अडचणीचे व जीवावर बेतण्यासारखे झाले आहे. पाऊस थांबल्यावर त्वरित खड्डे बुजवावेत किंवा समांतर डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.