डिंभे धरणाचे पाच दरवाजे उघडले; घोड नदीला पूर;नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:17 IST2025-09-28T13:16:44+5:302025-09-28T13:17:36+5:30
धरण भरू लागल्याने रात्रीपासून डिंभे धरणाचे सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले असून, सध्या धरणातून तब्बल २५,७९० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.

डिंभे धरणाचे पाच दरवाजे उघडले; घोड नदीला पूर;नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
आंबेगाव - डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील २४ तासांपासून संततधार पावसामुळे संपूर्ण आंबेगाव तालुका जलमय झाला आहे. या कालावधीत धरण क्षेत्रात १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याने डिंभे धरणात जलद गतीने पाणी साठू लागले आहे. धरण भरू लागल्याने रात्रीपासून डिंभे धरणाचे सर्व पाच दरवाजे उघडण्यात आले असून, सध्या धरणातून तब्बल २५,७९० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
यामुळे घोड नदी दुथडी भरून वाहत असून, नदीला पूराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, डिंभे धरणाजवळ ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीवर बाभळीचे झाड कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही वाहतूक सध्या सुपेधर मार्गे वळविण्यात आली आहे. घोड नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.