आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; जुना पूल आणि घाट वाहतुकीसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:43 IST2025-08-20T15:41:29+5:302025-08-20T15:43:33+5:30

मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला आणि लोणावळा परिसरासह वडीवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू झाल्याने नदीने रौद्रावतार धारण

pune rain Indrayani river floods in Alandi; Old bridge and ghat closed for traffic | आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; जुना पूल आणि घाट वाहतुकीसाठी बंद

आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; जुना पूल आणि घाट वाहतुकीसाठी बंद

आळंदी - इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी नदीच्या दोन्ही पात्रांतून तुडुंब पाणी वाहत आहे. याचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झाला असून भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच भक्त पुंडलिक मंदिरही पाण्यात बुडाले आहे.

मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला आणि लोणावळा परिसरासह वडीवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू झाल्याने नदीने रौद्रावतार धारण केला. बुधवारी (दि. २०) सकाळी खबरदारीचा उपाय म्हणून आळंदी पीएमपीएल बस स्थानकाजवळील जुना पूल व सिद्धबेट परिसरातील नवीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

वाहतुकीची सोय म्हणून शहराकडे येणारी व पुण्याला जाणारी गाड्या जुन्या पुलाशेजारील नवीन पुलावरून वळविण्यात आल्या आहेत. दरम्यान, भाविकांनी इंद्रायणी घाटावर जाऊ नये म्हणून नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने नगरपरिषद चौक, महाराष्ट्र बँक, पान दरवाजा, शनी मंदिर, झाडी बाजार पार्किंग, इंद्रायणी नगर कमान, विश्वशांती केंद्र हवेली बाजू घाट आदी ठिकाणी लाकडी बांबू व लोखंडी पत्रे लावून रस्ते बंद केले आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  इंद्रायणी नदीलगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले,पाऊस वाढत असल्याने इंद्रायणीच्या पुलाकडे नागरिकांनी व भाविकांनी जाऊ नये. नदीकाठावरील दुकाने व घरे बंद ठेवण्यात आली आहेत. प्रशासनाकडून पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस व आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहेत.

Web Title: pune rain Indrayani river floods in Alandi; Old bridge and ghat closed for traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.