Pune rain : हृदयद्रावक... आमच्या रंजना मावशी आम्हाला सोडून गेल्या...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 15:55 IST2026-04-04T15:54:08+5:302026-04-04T15:55:16+5:30
आमच्या डोळ्यांसमोर सगळं घडलं; पण काहीच करता आलं नाही

Pune rain : हृदयद्रावक... आमच्या रंजना मावशी आम्हाला सोडून गेल्या...!
पुणे : “मावशींशी आमचा जुना परिचय... रोजच्या आयुष्याचाच त्या एक भाग होत्या.” नवश्या मारुती परिसरात गेली सात-आठ वर्षे हार-फुले विकणाऱ्या ‘मावशी’ म्हणजे आमच्यासाठी केवळ विक्रेत्या नव्हत्या, तर एक आपुलकीने बोलणारी, हसतमुख व्यक्ती होती. कामावर जाताना-येताना त्यांच्याशी दोन शब्द बोलल्याशिवाय दिवस पूर्णच होत नसे. गुरुवारीही तसंच झालं. पाच ते दहा मिनिटांपूर्वीच गप्पा मारलेल्या मावशी क्षणात कायमच्या निघून गेल्या. आमच्या डोळ्यांसमोर सगळं घडलं; पण काहीच करता आलं नाही, अशा शब्दांत संगीता नागटिळक यांनी गुरुवारी (दि. २) पावसात झाड पडून मृत्यू पावलेल्या रंजना गिरी यांच्याविषयीच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
अचानक गुरुवारी अवकाळी पाऊस सुरू झाला. आम्ही चार-पाच जणी एकत्र होतो. आम्ही घाईघाईने आडोसा शोधू लागलो. तेवढ्यात मावशींना हाक मारली, “मावशी, तुम्हीपण चला, भिजाल.” पण त्या नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्याने म्हणाल्या, “अगं, माझी टपरी आहे ना, काही होत नाही. आज हनुमान जयंती आहे, ऑर्डर आहेत. नंतर गर्दी होईल, तोवर हार करून ठेवते.” त्यांचा कामाप्रती असलेला जीव आणि जबाबदारी आम्हाला ठाऊक होती. म्हणून आम्हीही फार आग्रह केला नाही. आम्ही सगळ्या जणी जवळच्याच आडोशाला गेलो आणि अवघ्या दहा मिनिटांत सगळं संपलं... अचानक जोरदार वारा आला आणि क्षणात एक मोठं वडाचं झाड मावशींच्या अंगावर कोसळलं. त्या क्षणी काय करावं, हेच सुचत नव्हतं. आम्ही धावत तिकडे गेलो. आसपासच्या लोकांनी मदत केली. पोलिसांना बोलावलं. त्यांना रिक्षात घालून रुग्णालयात पाठवलं; पण त्या झाड पडल्यावर तिथेच गेल्या होत्या.
आजही तो क्षण डोळ्यांसमोरून जात नाही. एकच विचार सतत मनाला टोचतो. “त्या आमच्यासोबत आल्या असत्या तर... त्या वाचल्या असत्या का?” ज्या वडाच्या झाडाने त्यांना वर्षानुवर्षे सावली दिली, त्याच झाडाने त्यांचा जीव घेतला. आज त्या जागेवरून जाताना पाय थांबतात. डोळे पाणावतात. एक हसतमुख चेहरा, असाच क्षणात हरवला असल्याचे सांगताना त्या भावनाविवश झाल्या.
रंजना गिरे यांच्या मृत्यूस जबाबदार कोण?
वडाचे झाड सहजासहजी कोसळत नाही. ते वर्षानुवर्षे मजबूत उभे राहते, सावली देते, आधार देते. मात्र, शहरांच्या वाढत्या काँक्रीटीकरणात झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सिमेंटचे रस्ते करताना झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा ठेवली जात नाही.
झाडांच्या मुळांना श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेली माती आणि पाणी कमी पडते. मुळांचा नैसर्गिक आधार हळूहळू कमकुवत होतो.
आणि मग एक जोरदार वारा झाड उन्मळून पडण्यासाठी पुरेसा ठरतो. रंजना गिरी यांच्या मृत्यूच्या मागे केवळ निसर्गाचा कोप होता का?
की शहर नियोजनातील त्रुटी, बेफिकिरी की दुर्लक्ष?