ऑनलाईन तिकीट सुविधेमुळे आरक्षण उपकेंद्राकडे प्रवाशांची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:48 IST2026-01-10T13:48:07+5:302026-01-10T13:48:16+5:30
-चार केंद्रांपैकी कॅम्प, रविवार पेठ येथील दोन उपकेंद्र बंद

ऑनलाईन तिकीट सुविधेमुळे आरक्षण उपकेंद्राकडे प्रवाशांची पाठ
पुणे : पुणे रेल्वे विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी शहरात चार ठिकाणी आरक्षण उपकेंद्र सुरू केले होते. परंतु ‘रेल वन’, ‘आयआरसीटीसी’ ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे आरक्षण उपकेंद्राला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्यामुळे कॅम्प आणि रविवार पेठ येथील दोन आरक्षण उपकेंद्रे बंद पडली आहेत. तर उर्वरित दोन केंद्राला प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत आहे.
डेक्कन जिमखाना आणि शंकरशेठ रोड येथील उपकेंद्रांत वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये नोव्हेंबरपर्यंत तुलनात्मक आढावा केला असता, तिकीट विक्री आणि प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. शंकरशेठ रोड येथील उपकेंद्रात मागील वर्षाच्या तुलनेत २२ हजार २५० तिकिटे कमी काढण्यात आली असून, सुमारे ४९ हजार प्रवाशांची घट झाली आहे. तर डेक्कन जिमखाना उपकेंद्रात तिकीट संख्येत ४४ हजार ३९४ तिकीट काढले असून, प्रवाशांमध्ये ८८ हजारांची घट नोंदवण्यात आली आहे.
रेल्वेकडून प्रवाशांना घरबसल्या तिकीट काढण्यासाठी सोयीचे व्हावी, यासाठी ‘रेल वन’, ‘आयआरसीटीसी’ ॲप सुरू करण्यात आले. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचतो. तसेच रांगेत उभे राहावे लागत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांचा कल ऑनलाईनकडे वाढल्याने दिवसेंदिवस या उपकेंद्रावरील तिकीट बुक करण्याची संख्या मंदावली आहे.
उपकेंद्रांवरील तिकीट कमी होण्याची ही आहेत कारणे :
-रेल्वेकडून ऑनलाईन सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
-‘रेल वन’ आणि ‘आयआरसीटीसी’ ॲपच्या माध्यमातून प्रवासी घरबसल्या तिकीट बुक करू शकतात.
-ॲपमुळे रांगेत उभे राहण्याची गरज राहत नाही, शिवाय वेळेची बचत होऊन जलद सेवा मिळते.
-प्रवाशांचा वेळ वाचतो, वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होत नाही.
डेक्कन जिमखाना आरक्षण उपकेंद्र
वर्ष -- तिकीट-- प्रवासी --- उत्पन्न
२०२३-२४-- १४६१५३ -- २,७१,१८३ -- १७,२७,७६,३६५
२०२४-२५ -- १२३९०३ -- २,२२,२२० -- १२,२८,०१,४९२
शंकरशेठ रोड आरक्षण उपकेंद्र :
वर्ष-- तिकीट-- प्रवासी -- उत्पन्न
२०२३-२४-- १,९६,७८१--- ३,६६,७००--- १८,०५,९७,४३३
२०२४-२५-- १,५२,३८७--- २,७७,८४२---- १३,८१,६४,२९५
रेल्वेकडून मोबाईल ॲपच्या माध्यमातून तिकीट बुक करण्याची जलद सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांचा कल हा ऑनलाईन तिकीट काढण्याकडे असून, यामुळे प्रवाशांना रांगेत थांबावे लागत नाही. शिवाय त्यांचा वेळही वाचतो. यामुळे रेल्वे प्रशासनावरील ताणही कमी होत आहे. -हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी