पुणे पोलिसांची मोठी कारवाई..! कुख्यात गँगस्टर गजा मारणेच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवणाऱ्यांना दणका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:48 IST2025-01-31T11:47:45+5:302025-01-31T11:48:38+5:30
गजा मारणेच्या नावाने इंस्टाग्राम पेज तयार करून त्यावर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट्स आणि रिल्स व्हायरल

पुणे पोलिसांची मोठी कारवाई..! कुख्यात गँगस्टर गजा मारणेच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवणाऱ्यांना दणका
- किरण शिंदे
पुणे - कुख्यात गँगस्टर गजा मारणे याच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट तयार करून गुन्हेगारीचं कौतुक करणाऱ्या चौघांना पुणे पोलिसांनीअटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून धाराशिवमधून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याने गजा मारणेच्या नावाने इंस्टाग्राम पेज तयार करून त्यावर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट्स आणि रिल्स व्हायरल केल्या होत्या.
दरम्यान, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांच्या नावाने सोशल मीडियावर अकाउंट चालवणाऱ्या आणि समाजात अशांतता निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. पोलिसांना माहिती मिळाली की, धाराशिवचा एक तरुण गजा मारणेच्या नावाने सोशल मीडिया अकाउंट चालवत आहे. त्याच्या पेजला तब्बल एक लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. तो गजा मारणे आणि इतर गुन्हेगारांचे फोटो, व्हिडिओ, तसेच गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट्स व्हायरल करत होता.
गुन्हेगारीला सोशल मीडियावर खतपाणी देणाऱ्या चौघांना अटक
फक्त धाराशिवच नव्हे, तर इतर ठिकाणीही अशा प्रकारच्या अकाउंट्सवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले असून आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून गुंडगिरीचं समर्थन करणाऱ्या पोस्ट्स आणि व्हिडिओ शेअर करत होते. त्यामुळे पोलिसांनी अशा पेजेस आणि अकाउंट्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारे गुन्हेगारीला पाठिंबा देणाऱ्या पेजेसवर लक्ष ठेवले जात असून, गुन्हे शाखेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. गुन्हेगारीचा महिमामंडन करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.