Fraud: 'मला आई बनवेल, असा पुरुष हवा!' जाहिरात पाहून कंत्राटदाराला भुरळ, लाखो रुपये गमावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:35 IST2025-10-30T16:34:22+5:302025-10-30T16:35:31+5:30
Pune Fraud News: बनावट जाहिरातीच्या जाळ्यात अडकवून पुण्यातील एका कंत्राटदाराने ११ लाख रुपये गमावले.

Fraud: 'मला आई बनवेल, असा पुरुष हवा!' जाहिरात पाहून कंत्राटदाराला भुरळ, लाखो रुपये गमावले!
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीने आता नवे स्वरूप धारण केले आहे. पुण्यात एका ४४ वर्षीय कंत्राटदाराला 'मला आई बनवू शकेल असा पुरुष हवाय' या आक्षेपार्ह आणि बनावट जाहिरातीच्या जाळ्यात अडकवून सायबर गुन्हेगारांनी एका कंत्राटदाराला ११ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुणे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर परिसरात राहणाऱ्या या कंत्राटदाराला फेसबुकवर एक जाहिरात दिसली. या जाहिरातीने आर्थिक अडचणीत असलेल्या कंत्राटदाराला पैसे कमवण्याचा सोपा मार्ग वाटला. जाहिरातीमध्ये असा दावा करण्यात आला की, "मला मूल हवे आहे. जो व्यक्ती मला तीन महिन्यांच्या आत गर्भवती करेल त्याला २५ लाख रुपये दिले जातील. शिवाय, त्याला गाडी आणि घरात वाटा मिळेल. तो शिक्षित असो किंवा नसो, किंवा कुठल्याही जातीचा असो, याची मला पर्वा नाही."
विविध शुल्कांच्या नावाखाली ११ लाख रुपये लुटले
कंत्राटदाराने जाहिरातीत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. समोरच्या व्यक्तीने त्याला 'प्रेग्नंट जॉब' नावाच्या कंपनीचा सहाय्यक असल्याचे सांगितले. तसेच महिलेला गर्भवती करण्यापूर्वी कंपनीत नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही सांगितले. फसवणूक करणाऱ्यांनी या कंत्राटदाराला विविध शुल्कांच्या नावाखाली पैसे मागण्यास सुरुवात केली. फसवणूक करणाऱ्यांनी जीएसटी, टीडीएस आणि प्रक्रिया शुल्क इत्यादींच्या नावाखालीही पैसे उकळले. त्याने सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ते २३ ऑक्टोबर दरम्यान १०० हून अधिक लहान-मोठे व्यवहार केले. ही सर्व देयके यूपीआय आणि आयएमपीएस ट्रान्सफरद्वारे करण्यात आली. त्याने एकूण ११ लाख रुपये ट्रान्सफर केले.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पैसे देऊनही काम न झाल्याने कंत्राटदाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यावर, फसवणूक करणाऱ्यांनी त्याला ब्लॉक केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची कंत्राटदाराच्या लक्षात आली. त्याने ताबडतोब बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी सोशल मीडियावरील अशा दिशाभूल करणाऱ्या आणि आक्षेपार्ह जाहिरातींना बळी पडू नये आणि कोणत्याही संशयास्पद ऑफरची त्वरित तक्रार सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर किंवा www.cybercrime.gov.in वर करावी, असे आवाहन पोलिसांनी केले.