पुणे पोलिसांनी ५ हजार जणांची उतरवली झिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 10:22 IST2024-12-28T10:20:07+5:302024-12-28T10:22:57+5:30
- ३१ डिसेंबर रोजी पोलिसांकडून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’साठी विशेष मोहीम

पुणे पोलिसांनी ५ हजार जणांची उतरवली झिंग
पुणे : सरत्या २०२४ या वर्षात लोकसभे पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका झाल्या. निवडणूक सुरळीत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी केली होती. यात गुन्हेगारांवर कारवाई करतानाच दारू पिऊन वाहने चालवणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला. १ जानेवारी ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत ५,२५६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
नववर्ष स्वागतासाठी पार्टी प्रेमी लोकांकडून पार्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात वाहतूक पोलिसही सज्ज झाले आहेत. वाहतूक शाखेकडून डिस्पोजेबल पाइपद्वारे ब्रेथ ॲॅनलायझरच्या मदतीने ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात ३० पेक्षा अधिक ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ड्रंक अँण्ड ड्राइव्हप्रकरणी न्यायालयात केली जाते सुनावणी..
- लॉकडाउन काळात ब्रेथ ॲनलायझरच्या वापरावर बंदी आणण्यात आली होती. परिणामी मद्यपी वाहनचालकांचे फावले. अनेकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत होते. ब्रेथ ॲनलायझरचा पुन्हा वापर डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्यात आला.
- वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास काही प्रकरणांमध्ये ई-चालानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’प्रकरणी कारवाई करून खटला न्यायालयाकडे वर्ग केला जातो. न्यायालयाकडून याप्रकरणी सुनावणी केली जाते.
- चालू वर्षात वाहतूक पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक म्हणजेच १ हजार ४३३ जणांवर कारवाई केली.
मद्यपी वाहनचालकांवर दाखल केलेले खटले
महिना - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ - २०२३ - २०२४ (२७ डिसेंबर अखेर)
जानेवारी - ५३२ - ३०० - ४७ - १४ - १९ - १३७
फेब्रुवारी - १०४९ - ४०६ - ०८ - ०१ - १९ - ७९
मार्च - १८६६ - ३६३ - ०७ - ०४ - ७४ - १२८
एप्रिल - २७०२ - ० - ० - १३ - २७ - ५०
मे - १४३५ - ० - ० - ० - ४९ - ३५८
जून - १२३८ - २०१ - २ - ५ - १४ - ७२४
जुलै - १४८९ - ५४ - ० - ० - ३४ - ६५८
ऑगस्ट - ३७६ - २४८ - ० - ० - ५३ - ४३०
सप्टेंबर - ६२६ - २९ - १ - ० - ० - ३५
ऑक्टोबर - ५६७ - ६२ - ० - ० - ७४ - १४३३
नोव्हेंबर - ७१२ - ४९ - ० - ० - ३० - ६७५
डिसेंबर - ५४९ - ३०५ - ४ - ० - १६९ - ५४९
एकूण - १३१४१ - २०१७ - ६९ - ३७ - ५६२ - ५२५६
वाहनचालकांनी नशा अथवा मद्यपान करून वाहन चालवू नये. शहरात ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राइव्हविरोधात कारवाई करण्यात येत आहे. विशेषत: नवीन वर्षाचे स्वागत करताना, सरत्या वर्षाला निरोप देताना आपल्यामुळे दुसऱ्या कुणाचा जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा अशा वाहनचालकांवर आम्ही कायदेशीर कारवाई करणारच. - अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा