पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; सदस्य संख्या वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 23:50 IST2025-08-22T23:49:49+5:302025-08-22T23:50:26+5:30
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत नागरिकांना त्यांच्या हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. येत्या ४ सप्टेंबरपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; सदस्य संख्या वाढली
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना अखेर जाहीर झाली आहे. ती गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा प्रभागाची संख्या एकने कमी होऊन ४१ झाली आहे. तर सदस्यांची संख्या एकने वाढून १६४ वरुन १६५ वर पोहचली आहे.
महापालिकेची आगामी निवडणुसाठी २०११ या वर्षाची लोकसंख्या गृहित धरुन प्रभागरचना करावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने ३४ लाख ८१ हजार ३५९ लोकसंख्या लक्षात घेत प्रभागरचना केली आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ४ लाख ६८ हजार तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या ४० हजार आहे. या लोकसंख्येच्या आधारे १६५ नगरसेवकांची निवड करण्यात येणार असून, यासाठी चार सदस्यांचे ४० आणि पाच सदस्यांचा एक असे मिळून ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी सांगितले.
हरकती-सूचना ४ सप्टेंबरपर्यंत नोंदविता येणार
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेबाबत नागरिकांना त्यांच्या हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. येत्या ४ सप्टेंबरपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत नागरिकांना हरकती नोंदविता येणार आहे. महापालिका मुख्य भवन, १५ क्षेत्रीय कार्यालये तसेच सावरकर भवन येथील महापालिकेच्या निवडणूक कार्यालय अशा तीन ठिकाणी या हरकती नाेंदविता येणार आहेत. ४ सप्टेंबरनंतर महापालिकेकडे आलेल्या हरकतींची छानणी करुन त्यावर सुनावणी घेतली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचीही प्रभाग रचना जाहीर
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मान्यता दिली आहे. एकूण ३२ प्रभागांसाठी प्रत्येकी चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मुख्य प्रशासकीय कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०१७ च्या प्रभाग रचनेत किरकोळ बदल करण्यात आले असून नैसर्गिकरित्या प्रभागांच्या हद्दी नव्याने तयार करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी २०१७ नंतर आता साडेआठ वर्षांनी महापालिकेची निवडणूक होणार आहे. ती २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. मागील जनगणना २०११ मध्ये झाली होती. तेव्हाच्या १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्येनुसार प्रभाग रचना तयार केली आहे. नागरिकांना २२ ऑगस्टपासून ४ सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती नोंदवण्याची संधी दिली गेली असून, त्यानंतर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी होणार आहे. तीन ते सहा ऑक्टोबरदरम्यान राज्य निवडणूक आयोग अंतिम मंजुरी देणार असून त्यानंतर प्रत्यक्ष प्रभाग रचना जाहीर होईल.