दिल्ली स्फोटानंतर पुण्यात ‘हाय अलर्ट’; रेल्वे, बस, मेट्रो स्थानक परिसरात कडक बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:34 IST2025-11-11T10:33:46+5:302025-11-11T10:34:17+5:30
संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हाॅटेल, लाॅजची तपासणी सुरू करण्यात आली आहे

दिल्ली स्फोटानंतर पुण्यात ‘हाय अलर्ट’; रेल्वे, बस, मेट्रो स्थानक परिसरात कडक बंदोबस्त
पुणे : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी सायंकाळी झालेल्या स्फोटानंतर शहरात सतर्कतेचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. ‘हाय अलर्ट’ जारी केल्याने शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, लाल किल्ला परिसरात सोमवारी (दि. १०) सायंकाळी एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, काही नागरिक जखमी झाले. दिल्लीत झालेला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.
दिल्लीतील स्फोटानंतर पुणे शहर परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. पुणे रेल्वे स्थानकासह मेट्रो,
स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानक परिसर, मध्यवर्ती भागात बंदोबस्तात वाढ करण्यात आली. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर शहरातील हाॅटेल, लाॅजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बेवारस वस्तू, तसेच संशयित व्यक्ती आढळून आल्यास लगेचच पोलिस नियंत्रण कक्षाशी (११२) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.