Video : 'येळकोट येळकोट जय मल्हार'..! शिखर काठ्यांच्या देवभेटी, भंडारा-खोबऱ्याची उधळण;जेजुरीत दोन लाख भाविकांचा महासागर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:23 IST2026-02-03T11:22:22+5:302026-02-03T11:23:50+5:30
- 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या गजरात जेजुरीत दोन लाख भाविकांचा महासागर; दरवर्षीपेक्षा यंदा जास्त गर्दी, पोलिसांचा कडक बंदोबस्त

Video : 'येळकोट येळकोट जय मल्हार'..! शिखर काठ्यांच्या देवभेटी, भंडारा-खोबऱ्याची उधळण;जेजुरीत दोन लाख भाविकांचा महासागर
जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या माघ पौर्णिमा यात्रेसाठी सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात, भंडार-खोबऱ्याची मुक्त्तहस्ताने उधळण करीत आज शिखर काठ्यांच्या देवभेटी उरकल्या. भाविकांनी ही दर्शन रांगा लावून कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. सुपे (बारामती) येथील खैरे काठीने सोबतच्या प्रासादिक काठ्यांसह सकाळी साडे अकरा वाजता खंडोबा गडावर जाऊन देवभेट उरकली. सोबत स्थानिक जेजुरीच्या होळकर काठीने ही देवभेट घेतली.
दुपारनंतर होलम राजा यांच्या समवेत मानाच्या प्रासादिक काठ्यांची वाजत-गाजत गावातून मिरवणूक निघाली. चावडीवर मानपान झाल्यावर काठ्या खंडोबा गडामध्ये आल्या. यावेळी भंडार-खोबऱ्याची प्रचंड उधळण झाल्याने सारा परिसर पिवळाधमक झाला. विविध रंगांची आकर्षक कापडी निशाणे असलेल्या मानाच्या काठ्या भक्त आनंदाने नाचवित होते. साडेतीन वाजण्याच्या सुमारास होलम शिखर काठीने देवभेट उरकली.
खंडोबा गडावर मुख्य विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे, देवसंस्थानचे व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी होलम राजा काठीचे मानकरी तुकाराम काठे, दिलीप गुंजाळ, संकेत काटे, कृष्णा वरपे, जयश्री चौधरी (अकोला काठी), वसंत जाधव, अशोक पवार, जेजुरी येथील होळकर काठीचे बबन बयास, तुषार गोडसे, बाळू नातू, अंकुश भांड, गणेश नातू तसेच सुपा (ता. बारामती) येथील खैरे काठीचे शहाजी खैरे, शरद खैरे, नवनाथ लहांगे, उमेश आपसुंदे, रमेश मोरे, पंकज पाटील, राजाभाऊ खैरे आदीचा सत्कार केला. यात्रेत भंडार-खोबरे ४०० रुपये किलो भावाने विकले गेले. यात्रेत दरवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांनी जास्त गर्दी केली होती. जेजुरी पोलिस ठाण्याचे सपोनि दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.