दिल्ली शहराच्या धर्तीवर उद्योगनगरीतील भटक्या कुत्र्यांचा ‘बंदोबस्त’ होणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 16:38 IST2025-08-13T16:38:03+5:302025-08-13T16:38:15+5:30
- प्रशासन म्हणते आदेश दिल्यानंतर उपाययोजना करू : वाढत चाललेला उपद्रव, वारंवार होणारे हल्ले आणि चाव्यांच्या घटनांमुळे शहरवासीयांचे लक्ष महापालिकेच्या निर्णयाकडे

दिल्ली शहराच्या धर्तीवर उद्योगनगरीतील भटक्या कुत्र्यांचा ‘बंदोबस्त’ होणार का ?
पिंपरी : दिल्ली आणि एनसीआर परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर, पिंपरी-चिंचवडमधील प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत चाललेला भटक्या कुत्र्यांचा उपद्रव, वारंवार होणारे हल्ले आणि चाव्यांच्या घटनांची संख्या पाहता येथेही कारवाई सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. मात्र, याविषयी न्यायालयाने आदेश दिल्यानंतर भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करू, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.
दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबादमधील भटक्या कुत्र्यांना आठ आठवड्यांत रस्त्यांवरून हटवून आश्रयस्थळी ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (दि.११) दिले आहेत. यामध्ये कुत्र्यांना पुन्हा रस्त्यावर सोडण्यास मनाई असून, स्थानिक प्रशासनाला विशेष पथके तैनात करण्याचा अधिकार मिळाला आहे. या आदेशामुळे २०२३ मधील प्राणी जन्मदर नियंत्रण (एबीसी) नियमांतर्गत ‘नसबंदी केल्यानंतर मूळ ठिकाणी परत सोडणे’ ही पद्धत रद्द झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवड प्रशासनावरही कडक कारवाई करण्याचा दबाव येत असून, पुढील काही आठवड्यांत दिल्लीसारखा निर्णय येथे लागू करण्याची अपेक्षा आहे.
नऊ वर्षांत सव्वालाख कुत्र्यांचा चावा
पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्या नऊ वर्षांत भटक्या कुत्र्यांनी १ लाख २६ हजार १७६ नागरिकांचा चावा घेतल्याची नोंद आहे. केवळ एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ८ हजार ३३५ चाव्यांच्या घटनाही घडल्या आहेत, तर २०२४-२५ मध्ये ही संख्या २८ हजार ९९ आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागत असून, अनेकदा रेबीज लस उपलब्ध नसल्यामुळे खासगी रुग्णालयांकडे जावे लागत आहे.
नसबंदी मोहीम अपयशी ?
महापालिकेच्या नसबंदी मोहिमेला यश आलेले नाही. नेहरूनगर येथील नसबंदी केंद्र आणि काही स्वयंसेवी संस्थांमार्फत मोहीम राबवली जाते; परंतु संसाधनांचा अभाव, तांत्रिक अडचणी आणि कामकाजातील सातत्य नसल्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी करता आलेली नाही. गतवर्षी कॅनिन कंट्रोल ॲण्ड केअर या संस्थेने आर्थिक अडचणींमुळे मोफत नसबंदी सेवा थांबवली होती. प्रशासनाने अलीकडेच १६ संविदा कर्मचाऱ्यांची भरती करून नसबंदी मोहिमेची गती वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण, टॅगिंग आणि तक्रारींसाठी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे प्रयत्न पुरेसे ठरलेले नाहीत.
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर ‘रेबीज’मुळे रुग्ण दगावू नये म्हणून ॲन्टीरेबीजचे इंजेक्शन दिले जाते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात जखमींना ते इंजेक्शन विनामूल्य दिले जाते. दरवर्षी या औषधीच्या दहा हजार बाटल्या खरेदी केल्या जातात. रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषधी आहेत. - डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
महापालिकेच्या नेहरूनगर येथील कुत्री नसबंदी केंद्रावर पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. पशुवैद्यकीय विभागाचे मनुष्यबळ वाढविण्यात येत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक, लाइव्ह स्टॉक सुपरवाझर, डॉग पिक स्कॉड कुली, अशी एकूण १६ पदे भरण्यात आली आहेत. कुत्र्यांच्या नसबंदी शस्त्रक्रिया वाढविण्यात येत आहेत. भटक्या कुत्र्यांबाबत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शहरातही उपाययोजना करू. - संदीप खोत, उपायुक्त, महापालिका