माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार की, एप्रिल फूल होणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 13:07 IST2026-02-15T13:06:41+5:302026-02-15T13:07:16+5:30

- मार्च डेडलाइन धोक्यात; अनेक स्थानकांवरील कामे अद्याप अपूर्ण 

Pune news Will the metro from Maan-Hinjawadi to Shivajinagar run? Will it be April Fools' Day? | माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार की, एप्रिल फूल होणार ?

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार की, एप्रिल फूल होणार ?

पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत सुरू होईल, या अपेक्षेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा न्यायालय ते बालेवाडी स्टेडियमदरम्यान अनेक मेट्रो स्थानकांवरील कामे संथगतीने सुरू आहेत.

यातील जिल्हा न्यायालय, शिवाजीनगर व कृषी महाविद्यालय स्थानक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थानक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्थानक, ‘यशदा’ आणि कृषी अनुसंधान स्थानक या मेट्रो स्थानकांची कामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो धावणार की एप्रिल फूल करणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे; परंतु सूत्रांच्या माहितीनुसार मेट्रो सुरू करण्यासाठी आणखी मुदतवाढ घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी पीपीपी तत्त्वावर पुणे आयटी सिटी मेट्रो या कंपनीला हे काम दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चअखेरपर्यंत हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ज्या मेट्रो स्थानकांची कामे मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगारदेखील काम करत आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवासी जिने व लिफ्ट जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे; परंतु या कामाला आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये मेट्रो सुरू होण्याची शक्यता कमी आहे; परंतु पीएमआरडीए प्रशासनाकडून एप्रिलमध्ये कसल्याही परिस्थितीत मेट्रो सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, सध्याची कामाची प्रगती पाहता हे मार्ग सुरू होण्यास अजून काही महिने लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चार ते पाच महिने अजून?

काही स्थानकांवरील शिल्लक राहिलेले काम बघितले तर आणखी किमान चार-पाच महिने लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषतः कॉन्कोर्स, लिफ्ट-एस्कलेटर बसविणे, तिकिटिंग प्रणाली, सुरक्षा चाचण्या, अग्निशमन यंत्रणा आदी कामे अद्याप पूर्णत्वास गेलेली नाहीत; परंतु पीएमआरडीएकडून एप्रिलमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्ष पाहणीतून वेगळे चित्र समोर आले आहे. मुख्यमंत्री स्तरावरून दिलेल्या आदेशांनंतरही कामाची गती वाढलेली दिसत नाही. दुसरीकडे वाहतूक कोंडीत अडकलेल्या हिंजवडी आयटी पार्क परिसरातील लाखो कर्मचाऱ्यांना या मार्गाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, सध्याच्या स्थितीवरून एप्रिलमध्ये सेवा सुरू होईल का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title : पुणे मेट्रो: लॉन्च में देरी? क्या यात्रियों के साथ अप्रैल फूल?

Web Summary : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लॉन्च में स्टेशन का काम अधूरा होने से देरी हो रही है। अप्रैल की समय सीमा असंभव लगती है, महीनों तक बढ़ सकती है। यात्रियों को राहत का इंतजार है।

Web Title : Pune Metro: Launch delayed? April Fool's joke on commuters?

Web Summary : The Hinjawadi-Shivajinagar Metro launch faces delays due to incomplete station work. April deadline seems unlikely, potentially extended by months. Commuters await relief.