कोण महापालिका? हे वाहनतळ माझं आहे, चला गुपचूप निघा..! सणांच्या दिवसांत पार्किंगसाठी लूटमार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:13 IST2025-10-04T14:12:52+5:302025-10-04T14:13:10+5:30
नागरिकांकडून पैसे घेऊन देत नाहीत पावती; सणांच्या दिवसात नागरिकांची लूटही जोरात

कोण महापालिका? हे वाहनतळ माझं आहे, चला गुपचूप निघा..! सणांच्या दिवसांत पार्किंगसाठी लूटमार
पुणे : वार गुरुवार... वेळ, सायंकाळी सातची... ठिकाण, महापालिकेचे शिवाजीराव आढाव वाहनतळ... एक व्यक्ती वाहनतळाचे नाव पाहून प्रवेशद्वारावरील एकाला विचारते, ‘‘हे वाहनतळ महापालिकेचे आहे का? तो म्हणतो कोण महापालिका? हे माझं आहे. महापालिका विसरा आता...’’ पुढे गेल्यावर दुसरा एक जोरदार ओरडतो, ‘‘ए गाडीचे हॅण्डल लॉक करू नको, नाही तर लॉक तुटलं तर बोलायचं नाही...’’ नंतर गाडी बाहेर काढताना पार्किंग शुल्क घेणारा म्हणतो, ‘‘पावती आणि पैसे दोन्ही द्यायचं आाणि गुपचुप पुढे निघायचं....,’’ अशी गुंडगिरीची आणि अरेरावीची भाषा महापालिकेच्या वाहनतळांवर ठेकेदारांच्या लोकांकडून केली जात आहे.
शहरातील नागरिकांच्या वाहनांसाठी महापालिकेच्या वतीने शहरात एकूण ३१ ठिकाणी सशुल्क वाहनतळांची व्यवस्था केली आहे. यातील बहुसंख्य वाहनतळ शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पेठांमध्ये आहेत. वर्दळीनुसार महापालिकेने वाहनतळांची वर्गवारी अ, ब आणि क अशा झोनमध्ये केली आहे. क झोनमध्ये मुख्य बाजारपेठ आणि नागरिकांनी गजबजणाऱ्या परिसर, ब झोनमध्ये मध्यम स्वरूपाची गर्दी (स्टेशन, बस स्थानक) तर झोन अ मध्ये उपनगरांमधील वाहनतळांचा समावेश आहे. या वर्गवारीनुसार पार्किंग शुल्क कमी जास्त आहे. मात्र, महापालिकेच्या बहुसंख्य वाहनतळांवर ठेकेदारांकडून निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क घेऊन नागरिकांची लूट केली जाते. शिवाय नागरिकांना अरेरावीची भाषा वापरून दहशत निर्माण केली जाते.
असेच चित्र व दहशत महापालिकेच्या लक्ष्मी रस्त्यावरील शिवाजीराव आढाव वाहनतळावर गुरुवारी सायंकाळी अनुभवण्यास मिळाले. सणांचे दिवस असल्याने लक्ष्मी रस्त्यावर गुरुवारी नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे वाहनतळावर दुचाकी पार्किंग साठी रांग लागली होता. खरेदासाठी आलेल्या एकाने सायंकाळी ६.२४ वा. दुचाकी पार्क केली. त्यानंतर तो सातच्या सुमारास तो व्यक्ती गाडी घेण्यासाठी वाहनतळामध्ये गेला. तो आत प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळील ठेकेदाराच्या एकाला म्हणाला, हे वाहनतळ महापालिकेचे आहे का? त्यावर त्याने वरील प्रमाणे उत्तर दिले. शिवाय हे वाहनतळावर क झोनमध्ये असल्याने दुचाकीसाठी एका तासाला ३ रुपये शुल्क असतानाही येथे एका तासाला १० रुपये शुल्क घेतले जात होते. एका तासानंतर पाच मिनिटे जास्त झाली तरी २० रुपये उकळले जात होते. पैसे आणि पावती दोन्ही घेतले जात होते. जे कोणी पावती मागतील त्याला एकेरी भाषा वापरून हुसकावून लावले जात होते. अनेकांच्या सोबत महिला व मुले असल्याने दहा वीस रुपयासाठी वाद नको म्हणून सर्वजण निमूटपणे निघून जात होते.
महापालिकेने लूटवर नियंत्रण आणणे गरजेचे -
सध्या सणांचे दिवस असल्याने खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे, अशा वेळी वाहनतळांच्या ठेकेदारांकडून केली जाणारी लूटही वाढणार आहेत. त्यामुळे महापालिकेने यावर काहीतरी नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
महापालिकेने निश्चित केलेले पार्किंग शुल्क -
अ झोन प्रतितास दुचाकी - १ रुपया, चारचाकी - ७ रुपये
ब झोन प्रतितास दुचाकी - २ रुपये, चारचाकी - १० रुपये
क झोन प्रतितास दुचाकी - ३ रुपये, चारचाकी - १४ रुपये