पश्चिम आदिवासी पट्ट्यात मार्चपासूनच पाणीसाठे आटले; भीमाशंकर परिसरात दुष्काळाची चाहूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:22 IST2026-03-08T13:22:01+5:302026-03-08T13:22:23+5:30

यंदा तर मार्च महिन्यापासूनच अनेक जलस्रोतांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.

pune news water reserves in the western tribal belt have dried up since March; drought looms in the Bhimashankar area | पश्चिम आदिवासी पट्ट्यात मार्चपासूनच पाणीसाठे आटले; भीमाशंकर परिसरात दुष्काळाची चाहूल

पश्चिम आदिवासी पट्ट्यात मार्चपासूनच पाणीसाठे आटले; भीमाशंकर परिसरात दुष्काळाची चाहूल

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाण्याचे साठे यंदा मार्च महिन्यापासूनच आटू लागले असून भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यांतील आदिवासी बांधवांना लवकरच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी या भागात दुष्काळाची चाहूल लागली आहे.

भीमाशंकर, पाटण व आहुपे हा परिसर मुसळधार पावसासाठी ओळखला जातो. पावसाळ्याच्या चार महिन्यांत येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे, तळी व शेततळी हे जलस्रोत पावसाळ्यात तुडुंब भरलेले दिसतात. मात्र उन्हाळा सुरू होताच या जलस्रोतांमधील पाणी झपाट्याने आटू लागते. यंदा तर मार्च महिन्यापासूनच अनेक जलस्रोतांनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.

या परिसरात उभारलेल्या कूपनलिकांमध्येही पाण्याचा थेंब राहत नसल्याने आदिवासी बांधवांना दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. अनेक गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागते. वर्षानुवर्षे हा प्रश्न कायम असून आदिवासी महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली उतरत नसल्याची परिस्थिती आहे.

भीमाशंकर परिसरासाठी महत्त्वाचा असलेला तेरुंगण (ता. आंबेगाव) येथील पाझर तलावातील पाण्याची पातळीही झपाट्याने कमी होत आहे. बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर परिसरातील गावांना लवकरच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गतवर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने लवकर काढता पाय घेतल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. आदिवासी भागाच्या उशाशी असलेल्या डिंभे धरणाचे पाणी जवळ असले तरी अनेक वर्षांपासून स्थानिकांना त्याचा पुरेसा लाभ मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. विहिरी, शिवकालीन टाक्या, बुडीत बंधारे, तळी आणि शेततळी हेच या भागातील प्रमुख जलस्रोत असल्याने ते आटू लागल्याने पुढील काही महिन्यांत पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी जनतेबरोबरच जनावरांनाही पाण्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

Web Title: pune news water reserves in the western tribal belt have dried up since March; drought looms in the Bhimashankar area