तरंगवाडी तलावातील पाणी कमी; तीनशे एकर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा आल्या धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 12:30 IST2025-08-14T12:30:37+5:302025-08-14T12:30:57+5:30
- पाऊस न झाल्याचा परिणाम, चार गावांतील पाणी योजनाही याच तलावावर अवलंबून, गाळ काढण्याची स्थानिकांची मागणी

तरंगवाडी तलावातील पाणी कमी; तीनशे एकर क्षेत्रावरील पिके आणि फळबागा आल्या धोक्यात
इंदापूर : मे महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसामुळे तरंगवाडी तलावाच्या परिसरातील सहा गावांतील सुमारे तीनशे एकर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांनी आतापर्यंत तग धरलेला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून मोठा पाऊस न झाल्याने आणि तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पिके जळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे तरंगवाडी तलावात तातडीने पाणी सोडावे आणि भविष्यात तलावातील गाळ काढण्याची मागणी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
इंदापूर-बारामती राज्य रस्त्यापासून काही अंतरावर, पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असणारा तरंगवाडी तलाव ६७ एमसीएफटी पाणी साठवण क्षमता असलेला आहे. हा तलाव निरा डावा कालवा आणि खडकवासला कालव्यातून भरला जातो. गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी, विठ्ठलवाडी, वडापुरी आणि इंदापूर या सहा गावांतील सुमारे तीनशे एकर क्षेत्रावरील पिके, फळबागा आणि गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी, झगडेवाडी या चार गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना यावर अवलंबून आहेत. तसेच तलावातून १०५ अधिकृत पाणी परवानग्या देण्यात आलेल्या आहेत.
मे महिन्यातील पावसामुळे तलावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यामुळे ऊस, मका, कडवळ यासारखी पिके आणि केळी, डाळिंबाच्या बागा सध्या जिवंत आहेत. परंतु, गेल्या दोन-अडीच महिन्यांत मोठा पाऊस न झाल्याने तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. येत्या काही दिवसांत पाणी न आल्यास हातातोंडाशी आलेली पिके जळण्याची शक्यता आहे.
गोखळी येथील भैरवनाथ सहकारी पाणीवापर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन गोफणे यांनी सांगितले, “परिसरातील गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण तरंगवाडी तलावावर अवलंबून आहे. मेनंतर मोठा पाऊस न झाल्याने पिके आणि फळबागा धोक्यात आहेत. त्यामुळे खडकवासला कालवा किंवा निरा डाव्या कालव्यातून तलावात तातडीने पाणी सोडावे.” तसेच भविष्यात तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करावे, अशी मागणीही त्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. ही मागणी गोखळीचे माजी सरपंच बापू पोळ, तरंगवाडीचे सरपंच आप्पा शिंदे, झगडेवाडीचे सरपंच अतुल झगडे, विठ्ठलवाडीचे सरपंच दिलीप भोंग, उपसरपंच सुहास बोराटे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केली आहे.
तलावाचा व्यापक उपयोग
तरंगवाडी तलावातून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, विद्या प्रतिष्ठान, दूधगंगा आणि सोनाई दूध संघ यांना पाणीपुरवठा होतो. यापैकी काही संस्थांनी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था केली असली, तरी तलावावर अवलंबून असणाऱ्या गावांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. यापूर्वी इंदापूर नगरपरिषदेला तलावातून पाणीपुरवठा होत होता, परंतु त्यांनी तो नाकारला. आता पुन्हा तेथून पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणीही जोर धरत आहे.
तलावात पाणी सोडा
नितीन गोफणे यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि प्रशासनाकडे तलावात पाणी सोडण्याची मागणी लवकरच केली जाणार आहे. तसेच दीड महिन्यापूर्वी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात कृषिमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा पाठपुरावा करून तलावाचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याची मागणीही पुढे केली जाईल.