पाणी जारमध्ये,सुविधा शून्य..! बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा ढिसाळ कारभार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:37 IST2026-03-17T16:36:53+5:302026-03-17T16:37:37+5:30

- पाणी आले, पण स्वच्छतागृहाचा पत्ता नाही

pune news water in jars, zero facilities The sloppy management of Bibvewadi regional office exposed | पाणी जारमध्ये,सुविधा शून्य..! बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा ढिसाळ कारभार उघड

पाणी जारमध्ये,सुविधा शून्य..! बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचा ढिसाळ कारभार उघड

- शिवाजी यादव
 
बिबवेवाडी :
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन अखेर जागे झाले. कार्यालयात पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरते जार ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक आणि कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी कार्यालयातील अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे वास्तव ग्राऊंड रिपोर्टमध्ये निदर्शनास आले आहे.

लोकमत प्रतिनिधीने गुरुवारी पुणे-सातारा रस्त्यावरील बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयात फेरफटका मारला असता, कार्यालयात आजही स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे वास्तव समोर आले. दक्षिण उपनगरातील अत्यंत वर्दळीच्या आणि रहदारीच्या भागात हे कार्यालय असून, या ठिकाणी जन्म मृत्यू दाखला, मिळकत कर भरणा, स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी अशा विविध कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यातच येथील कर्मचारी मोबाइलमध्ये जास्त व्यग्र असल्याने त्याने नागरिकांसोबत बोलायला काय, बघायलाही वेळ नसल्याने नागरिकांना प्रतीक्षेशिवाय पर्याय राहत नाही. कोणत्याही कामासाठी माणूस गेला, तरीही तासभराचा वेळ जाणार, मात्र स्वच्छतागृह नसल्यामुळे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितल्या.

महिलांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेला हिरकणी कक्षही सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. आधीच जागेचा अभाव असताना, हिरकणी कक्षाने बिनकामाची जागा अडवून ठेवली असल्याचे कुंड गोडांबे यांनी सांगितले. स्वच्छतेचा अभाव, देखभालीकडे दुर्लक्ष आणि आवश्यक सुविधांची कमतरता यामुळे हा कक्ष नावापुरताच उरल्याचे चित्र आहे. महिलांच्या सन्मानाच्या नावाने उभारलेली ही सुविधा आज प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक बनल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, कार्यालयातील काही अधिकारी दिवसभर मोबाइलमध्ये व्यग्र असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष होत असून, अधिकाऱ्यांवर कोणाचाही धाक उरलेला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीमागे सहायक आयुक्तांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

विशेष म्हणजे लोकमतचे प्रतिनिधी गेल्या चार-पाच महिन्यांत अनेकदा कार्यालयात भेट देऊनही सहायक आयुक्त एकदाही आपल्या जागेवर आढळून आले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्या कशा भेटणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अनेकदा फोन उचलला जात नाही किंवा विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्याचीही तक्रार आहे.

लोकमतच्या वृत्तानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी स्वच्छतागृहाचा अभाव, हिरकणी कक्षाची दुरवस्था आणि कार्यालयीन कामकाजातील ढिसाळपणा हे प्रश्न अद्याप कायम आहेत. त्यामुळे या सर्व समस्यांवर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

 नागरिकांच्या सेवेसाठी असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातच नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, यापेक्षा दुर्दैवाची आणि लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? विविध कामांसाठी येथे येणाऱ्या लोकांना तासन्तास थांबावे लागते; मात्र मूलभूत सुविधाच उपलब्ध नाहीत. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाला नागरिकांच्या गैरसोयीची जाणीव आहे का ? - शैलेंद्र नलावडे

Web Title : बिबवेवाड़ी कार्यालय: पानी उपलब्ध, लेकिन बुनियादी सुविधाएं गायब।

Web Summary : पानी के जार के बावजूद, बिबवेवाड़ी कार्यालय में शौचालय और कार्यात्मक 'हिरकणी' कक्ष का अभाव है, जिससे महिलाओं और वरिष्ठ नागरिकों को कठिनाई हो रही है। लापरवाही और अनुपस्थित अधिकारी नागरिकों की पीड़ा को बढ़ा रहे हैं।

Web Title : Bibwewadi office: Water available, but basic amenities still missing.

Web Summary : Despite water jars, Bibwewadi office lacks toilets and a functional 'Hirkani' room, causing hardship, especially for women and seniors. Neglect and absent officials exacerbate citizen woes.