रोटी गावातील ‘जावळ’ प्रथा वादाच्या भोवऱ्यात; जावळ प्रथेवर महिला आयोगाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:43 IST2026-01-03T13:43:22+5:302026-01-03T13:43:56+5:30
या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले

रोटी गावातील ‘जावळ’ प्रथा वादाच्या भोवऱ्यात; जावळ प्रथेवर महिला आयोगाकडून दखल
वासुंदे : दौंड तालुक्यातील रोटी (ता. दौंड) येथील श्री रोटमलनाथ मंदिरात होणाऱ्या पारंपरिक जावळ विधीमध्ये महिलांना जबरदस्तीने मुंडन करून विद्रूप केले जात असल्याच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, या निर्णयाचे दौंड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवाडे व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी रोटी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष येऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी दौंड पंचायत समितीच्या माजी सभापती आशा शितोळे, पाटसच्या माजी सरपंच अवंतिका शितोळे, कुसेगावच्या माजी सरपंच छाया शितोळे तसेच कुरकुंभच्या पोलिस पाटील रेश्मा शितोळे यांनी आपली भूमिका मांडली.
ग्रामस्थ व महिलांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, रोटी येथे सुरू असलेली जावळ करण्याची प्रथा ही ऐतिहासिक काळापासून चालत आलेली परंपरा असून, त्याचा आम्हाला अभिमान आहे. या विधीमध्ये महिलांवर कोणतीही सक्ती अथवा जबरदस्ती केली जात नाही. महिलाच स्वेच्छेने डोक्यावरील केस किंवा एक बट अर्पण करतात. तसेच कोणत्याही प्रकारचा मानसिक किंवा शारीरिक छळ होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ही रूढी-परंपरा यापुढेही सुरूच राहावी, असे मत व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्रात अनेक अनिष्ट रूढी-परंपरांवर कायद्याने बंदी घालण्यात आल्याचे नमूद करत महिला आयोगाच्या सचिव नंदिनी आवाडे यांनी ग्रामस्थांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राष्ट्रमाता जिजाऊंनीही अशा अनेक अनिष्ट प्रथांना विरोध करून बंदी घातल्याचा संदर्भ देत, सध्या सुरू असलेल्या या रूढी-परंपरेबाबत महिलांनी व ग्रामस्थांनी विचार करावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या बैठकीस पुणे विभागीय उपायुक्त संजय माने, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण मरभळ, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव व संदीप काळे, रोटी ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी दिलीप जगताप, ग्रामपंचायत अधिकारी संजय सकट, मंडलाधिकारी, तलाठी, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.