चिंबळी येथे पुणे-नाशिक महामार्ग भूसंपादनाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मोजणी प्रक्रिया खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:55 IST2025-09-30T14:54:55+5:302025-09-30T14:55:11+5:30
आम्ही विकासाला विरोध करत नाही, पण आमच्या जमिनी आणि उपजीविका धोक्यात येणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही

चिंबळी येथे पुणे-नाशिक महामार्ग भूसंपादनाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; मोजणी प्रक्रिया खंडित
कुरुळी : दि. २८ सप्टेंबर २०२५: खेड तालुक्यातील चिंबळी गावात पुणे-नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुरू झालेल्या मोजणी प्रक्रियेला स्थानिक ग्रामस्थ आणि बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविल्याने प्रशासनाला ती थांबवावी लागली. उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक ०६, भूकरमापक, जेई पीएमआरडीए, अंसि, डी.आय.एल.आर. आणि पीएमआरडीए यांच्या संयुक्त पथकाने २६ सप्टेंबर रोजी गट क्रमांक ११९, ११८, ११३, १०१, ९३, ४८ आणि ४७ येथे मोजणी (मो.र. क्र. ०७९३९४) सुरू केली होती. मात्र, भूसंपादनाची रुंदी २२.५ मीटरवरून ३० मीटरपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला.
यापूर्वी २२.५ मीटर रुंदीच्या भूसंपादनाला ग्रामस्थांनी संमती दर्शविली होती. परंतु, आता रुंदी वाढवल्याने शेतजमिनी, घरे आणि उपजीविकेवर थेट परिणाम होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. “आम्ही विकासाला विरोध करत नाही, पण आमच्या जमिनी आणि उपजीविका धोक्यात येणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून सह्या घेऊन तो शासनाला सादर केला.
संयुक्त पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा प्रकल्प सार्वजनिक हितासाठी महत्त्वाचा असून, त्यासाठी भूसंपादन आवश्यक आहे. नियमानुसार मोजणी सुरू झाली असली, तरी ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे पुढील अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. यावेळी बाजीराव जैद, किसन गायकवाड, धर्मा मेमाने, नरेंद्र परदेशी, बाळासाहेब जैद, दादासाहेब जैद, कुंदन कारचे, हितेश चड्डा, आकाश जैद, संतोष जैद, सतीश गायकवाड, प्रशांत जैद, दत्तात्रय जैद, सोपान जैद, पुष्कर जैद, रामदास गायकवाड, हनुमंत गायकवाड, गुलाब गायकवाड, अजित विलास गायकवाड, मयूर गायकवाड, अमोल जैद, चिन्मय गायकवाड यांच्यासह अनेक शेतकरी आणि पंच उपस्थित होते. ग्रामस्थांचा ठाम विरोध आणि प्रशासनाचे नियोजन यामधील तणावामुळे भूसंपादन प्रक्रिया पुढे कशी प्रगती करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.